अजूनही सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझ गिल? लग्नाच्या प्रश्नावर म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:57 IST2025-11-02T12:56:06+5:302025-11-02T12:57:30+5:30
शहनाझ 'इक कुडी' या पंजाबी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

अजूनही सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझ गिल? लग्नाच्या प्रश्नावर म्हणाली...
'बिग बॉस १३'मधून अभिनेत्री शहनाझ गिल घराघरात पोहचली. शहनाझ तिच्या वागण्यामुळे आणि सरळ साध्या स्वभावामुळे चाहत्यांची आवडती बनली होती. बिग बॉसच्या घरात शहनाझ आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यातील केमिस्ट्री खूप गाजली, चाहत्यांनी त्यांना 'सिडनाज' असे नाव दिले. घरातून बाहेर पडल्यावरही चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअरची चर्चा कायम होती. त्यांची जोडी 'बिग बॉस १३' ची सर्वात लोकप्रिय जोडी मानली जात होती. मात्र, सिद्धार्थच्या अकाली निधनाने शहनाझला मोठा भावनिक धक्का बसला. हा आघात सहन करणे तिच्यासाठी अत्यंत कठीण होते. पण, शहनाझने स्वतःला सावरले. त्या वेदनादायक क्षणातून बाहेर पडत तिने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं. आता शहनाझ 'इक कुडी' या पंजाबी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शहनाझचा 'इक कुडी' चित्रपट ३१ ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटातून शहनाझ गिलने निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. एका महिलेचा योग्य जोडीदार शोधण्याचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शहनाझ गिलनं लग्नावर भाष्य केलंय. 'इक कुडी' चित्रपटाच्या निमित्ताने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत शहनाझला आजच्या काळात लग्न आवश्यक आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शहनाझने अत्यंत स्पष्ट उत्तर दिले. ती म्हणाली, "लग्न आवश्यक नाही. जर तुम्हाला लग्न करायचे नसेल तर ते ठीक आहे. लोक लग्न करतात, तेही ठीक आहे".
लग्न करण्याची तिची सध्या कोणतीही योजना नसली तरी, भविष्यात ती शक्यता पूर्णपणे नाकारत नाही. ती पुढे म्हणाली, "जरी मला वाटत असले की मी लग्न करणार नाही, तरी मी कधीही करणार नाही असे मी म्हणू शकत नाही. मला उद्या लग्न करावे लागू शकते. मला स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यावा लागेल".
'बिग बॉस १३' मधील दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत राहिलेल्या शहनाझने लग्न हे आयुष्याचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असं म्हटलं. ती म्हणाली, "तुम्ही तुमच्या पालकांचे घर सोडून तुमचे संपूर्ण आयुष्य एका मुलाला देत आहात. तुम्ही त्याच्यासाठी सर्व काही करत आहात. हा एक मोठा निर्णय आहे".
'बिग बॉस १३'नंतर शहनाझ गिलची लोकप्रियता प्रचंड वाढली. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास २०१५ मध्ये तिने "शिव दी किताब" या म्युझिक व्हिडीओने तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर तिने २०१७ मध्ये "सत श्री अकाल इंग्लंड" या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तिने 'हौसला रख', सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' आणि 'थँक्यू फॉर कमिंग' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.