अभिनेत्रीचा राज्य शासनाच्या पुरस्कारानं गौरव; म्हणाली "कधीच पुरस्कारांसाठी काम केलं नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:20 IST2025-09-07T10:19:43+5:302025-09-07T10:20:40+5:30
ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेत्रीचा राज्य शासनाच्या पुरस्कारानं गौरव; म्हणाली "कधीच पुरस्कारांसाठी काम केलं नाही"
अभिनेत्री शर्मिला शिंदे हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. विविधांगी भूमिका साकारून शर्मिलाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. याच कामाची कामाची पोचपावती तिला मिळाली आहे. शर्मिला शिंदेला 'ज्याची त्याची लव्ह स्टोरी' या नाटकातील भूमिकेसाठी तिला राज्य शासनाचा पुरस्कार (Sharmila Shinde Receives State Award) प्रदान करण्यात आला आहे. ही आनंदाची बातमी शर्मिलाने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
शर्मिलाने पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कॅप्शनमध्ये ती म्हणते, "महाराष्ट्र शासनाने 'ज्याची त्याची लव्ह स्टोरी' या नाटकातील अभिनयासाठी माझ्या गळ्यात हे जड रौप्य पदक घालून माझं वजन वाढवलं".
पुढे ती म्हणाली, "खरं सांगायचं तर, मी कधीच पुरस्कारांसाठी काम केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. पण मी खोटं बोलणार नाही, हा पुरस्कार मला हवा होता. कारण शासकीय पुरस्कारांचा मानच तेवढा मोठा असतो".
शर्मिलाने एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. ती म्हणाली, "काही वर्षांपूर्वी 'सफरचंद' हे नाटक करत असताना माझा मित्र आमिर तडवळकर मला म्हणाला होता, 'तू बघच, तुला यावर्षी राज्य नाट्य पुरस्कार मिळणार'. मी अतिशय अविश्वासाने त्याच्याकडे बघत विचारलं होत, "हो? खरच मला हा पुरस्कार मिळू शकतो?" माझ्या बद्दल भयानक विश्वास दाखवत त्याने माझ्यासमोर एक एक दोन दोन वेळा हा पुरस्कार मिळालेल्या लोकांची नाव मोजली. त्या वर्षी काही हा पुरस्कार मला मिळाला नाही. पण या वर्षी ध्यानी मनी नसताना सुद्धा हा सुवर्ण क्षण काल माझ्या आयुष्यात आला. या पुरस्काराचं वजन मला कितपत पेलवेल मला माहीत नाही. पण, मी नक्की पूर्ण प्रयत्न करेन. माझ्या आजपर्यंतच्या 'ज्याची त्याची लव्ह स्टोरी'च्या प्रवासात माझ्या संपूर्ण टीमने मला केलेल्या सहकार्याबद्दल मी कृतज्ञ आहे", या शब्दात तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.