"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:54 IST2025-09-25T15:46:17+5:302025-09-25T15:54:29+5:30
Shantanu Moghe News: प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झालं. तिच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनूची या मालिकेत एन्ट्री झाली होती.

"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
अभिनेता शंतनू मोघे 'येड लागलं प्रेमाचं' या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसत आहे. शंतनू हा दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठेचा पती आहे. प्रियाचं काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झालं. तिच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनूची या मालिकेत एन्ट्री झाली होती. प्रियाच्या आदल्या रात्रीच त्याच्या मालिकेचा तो एपिसोड पाहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. आता शंतनूने दु:ख बाजूला सारुन पुन्हा मालिकेत कमबॅक केलं आहे. नुकतीच त्याने मालिकेच्या सेटवरुन पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शंतनू मोघे म्हणाला, "मालिकेतली माझी भूमिका खूप मस्त आहे. ही मालिका एक तर बरेच लोक आवर्जुन बघतात. जेव्हा या भूमिकेसाठी चॅनलकडून मला फोन आला तेव्हाच मला यातलं वेगळेपण कळलं होतं. इतक्यात मी अशी भूमिका केलीही नव्हती. मी महाराजांची भूमिका केली नंतर शहाजीराजांचीही केली. या ऐतिहासिक भूमिकांनंतर मी आई कुठे काय करते मालिकेत अत्यंत सपोर्टिव्ह, खूप प्रेमळ भूमिका केली होती. नंतर छोट्या बयोची मोठी स्वप्न मध्ये नकारात्मक भूमिका साकारली. आता येड लागलं प्रेमाचं मालिकेची गोष्ट, त्यातली माझी भूमिका, संपूर्ण शोचा फ्लेवर मला खूप वेगळा आणि छान वाटला. म्हणून नकार देण्याचा संबंधच नव्हता."
काम पाहून त्यावर काय चूक काय बरोबर हे सांगणारी तुझ्या आयुष्यातली व्यक्ती कोण? यावर शंतनू म्हणाला, "माझ्या आयुष्यातली क्रिटिक माझी आई आहे. मी तिला नेहमी म्हणतो की आई, यातलं काहीतरी छान पहिले सांग ना! मग नंतर जे काय चुकलंय ते सांग. एकंदर माझा एक ह्युमन थॉट असा आहे की जे चांगलंय ते आधी सांगा. मला प्रेक्षकांनाही हेच सांगायचं आहे. अनेकदा मराठी माणसाचा नेहमी अप्रोच असा असतो की नाही रे, हे काय बरोबर नाही, मजा नाही आली रे. तर माझी त्यांना एक विनंती असते की तुम्ही जे काही बघता त्यातल्या ३ गोष्टी बऱ्या सांगा आणि मग ५ गोष्टी वाईट सांगा घेणाऱ्याला ते खूप छान आणि चांगल्या पद्धतीने घेता येतं. "
प्रियाच्या निधनानंतर शंतनू दु:ख कुरवाळत न बसता पुन्हा कामाला लागला आहे. पुन्हा हसण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या या धैर्याचं कौतुकही होत आहे. 'दु:ख विसरुन पुन्हा कामाला लागणे, चेहऱ्यावर हसू आणणे सोपे नाही', 'पुढील आयुष्यात फक्त आनंद मिळू दे' अशा शब्दात प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.