'मुरांबा'मध्ये सात वर्षांचा लीप, रमा-अक्षयच्या आयुष्यात काय घडणार याची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:37 IST2025-07-24T14:35:48+5:302025-07-24T14:37:04+5:30

'मुरांबा' (Muramba Serial) मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला. रमा-अक्षयची जोडी आणि संपूर्ण मुकादम कुटुंब अल्पावधितच लोकप्रिय झालं. लवकरच मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे.

Seven-year leap in 'Muramba', curiosity is peaking as to what will happen in Rama-Akshay's life | 'मुरांबा'मध्ये सात वर्षांचा लीप, रमा-अक्षयच्या आयुष्यात काय घडणार याची उत्सुकता शिगेला

'मुरांबा'मध्ये सात वर्षांचा लीप, रमा-अक्षयच्या आयुष्यात काय घडणार याची उत्सुकता शिगेला

स्टार प्रवाहच्या 'मुरांबा' (Muramba Serial) मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या प्रवासात मालिकेच्या संपूर्ण टीमला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. रमा-अक्षयची जोडी आणि संपूर्ण मुकादम कुटुंब अल्पावधितच लोकप्रिय झालं. लवकरच मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. या सात वर्षांमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. 

एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय एकमेकांपासून दुरावले आहेत. तर तिकडे इरावती आपल्या सुडबुद्धीने संपूर्ण मुकादम कुटुंबाला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करते आहे. या सगळ्यात अक्षयच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देणारी एकमेव घटना म्हणजे रमा आणि त्याची लाडकी लेक आरोही. अतिशय गोड, चुणचुणीत, बडबडी आणि हसरी असणारी आरोही रमा आणि अक्षयला एकत्र आणणार का हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.

बालकलाकार आरंभी उबाळेची मालिकेत एन्ट्री

बालकलाकार आरंभी उबाळे आरोहीच्या भूमिकेत दिसणार आहे. मुरांबामध्ये सुरु होणाऱ्या या नव्या अध्यायाविषयी सांगताना अक्षय म्हणजेच शशांक केतकर म्हणाला, ''मालिकेने ११०० भागांचा टप्पा गाठला आहे आणि हा प्रवास सुसाट सुरु आहे. यासाठी स्टार प्रवाह वाहिनी, मालिकेची संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. जोवर वाहिनी, लेखक आणि दिग्दर्शकांना गोष्टीमध्ये क्षमता दिसते तोवर ती गोष्ट रंगवत रहाणं हेच खरं कौशल्य असतं याचा मी एक भाग आहे याचा आनंद आहे. आपल्या आयुष्यात जसे वेगवेगळे टप्पे येत असतात. त्याप्रमाणे मालिकेतही वेगवेगळी वळणं येतात.'' 


''रमा-अक्षयचं एकत्र येणं, त्यांचं प्रेम, त्यांची भांडणं हे सारं आपण अनुभवलं. आता त्यांच्या आयुष्यात एक चिमुकली देखील आहे. मुरांबा ही माझ्या आयुष्यातली जास्त भागांची मालिका आहे. याआधी इतक्या भागांची मालिका आणि इतक्या मोठ्या मुलीचे वडील मी कधीही साकारलेले नाही त्यामुळे वेगळा अनुभव आहे. खऱ्या आयुष्यात देखील मी वडील असल्यामुळे सीन करताना देखील माझ्यातला बाप डोकावत असतो. प्रेक्षकांना मालिकेतलं हे नवं वळण पहाताना नक्की मज्जा येईल याची खात्री आहे.'', असे शशांक म्हणाला.

Web Title: Seven-year leap in 'Muramba', curiosity is peaking as to what will happen in Rama-Akshay's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.