'#लय आवडतेस तू मला'मध्ये सीक्रेट सांताची एन्ट्री! जाणून घ्या सरकार-सानिकाच्या ख्रिसमसच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:58 IST2024-12-24T17:57:22+5:302024-12-24T17:58:03+5:30
Hashtag Lay Aavadtes Tu Mala : '#लय आवडतेस तू मला' या मालिकेतही आता सीक्रेट सांताची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे सरकारच्या आयुष्यातील हे पहिलच ख्रिसमस सेलिब्रेशन असणार आहे.

'#लय आवडतेस तू मला'मध्ये सीक्रेट सांताची एन्ट्री! जाणून घ्या सरकार-सानिकाच्या ख्रिसमसच्या आठवणी
सध्या सर्वत्र ख्रिसमसचा माहोल आहे. 'कलर्स मराठी'वरील '#लय आवडतेस तू मला' (Hashtag Lay Aavadtes Tu Mala) या मालिकेतही आता सीक्रेट सांताची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे सरकारच्या आयुष्यातील हे पहिलच ख्रिसमस सेलिब्रेशन असणार आहे. त्यामुळे मालिकेतील आगामी ट्रॅक त्याच्यासाठी खूप उत्सुकतेचा असणार आहे. सरकारने आजवर सानिकासाठी बरंच काही केलंय. त्यामुळेच सानिका सरकारसाठी काहीतरी खास सरप्राईज देणार आहे. दोघांमधील ही केमिस्ट्री पाहायला खूपच गोड असून ती प्रेक्षकांच्या आवडीची झाली आहे. सरकारला आता त्याचा सीक्रेट सांता आणि या सांताने दिलेलं गिफ्ट काय आहे हे जाणून घेण्याची प्रतीक्षा आहे.
'#लय आवडतेस तू मला' या मालिकेतील सरकार म्हणजेच तन्मय जक्का आपल्या ख्रिसमसबद्दलच्या आठवणींना उजाळा देत म्हणाला, "शाळेत असल्यापासूनच मला ख्रिसमस या सणाबद्दल खूप आकर्षण होतं. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर तो उत्साह आणखी वाढला. ख्रिसमसच्या दिवसांमध्ये सांताची लाल रंगाची टोपी, फुगे या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळीच गंमत वाटायची. कॉलेजमध्ये असताना पुण्यातील कँममध्ये जाऊन तिथल्या चर्चेमध्ये आम्ही २५ डिसेंबर साजरा करत असू. मित्रांसोबत केलेलं हँगआऊट हीच माझी ख्रिसमसची लक्षवेधी आठवण आहे".
माझे पहिले सांताक्लॉज माझे आई बाबा-तन्मय जक्का
तन्मय पुढे म्हणाला,"सांता येऊन आपल्या उशीखाली गिफ्ट ठेवतो, अशी खूप टिपिकल माहिती मला लहानपणी मिळाली होती. त्यामुळे शाळेत असताना मी एकदा २५ डिसेंबरला सकाळी लवकर उठून उशीखाली पाहिलं होतं पण काही मिळालं नव्हतं. त्यामुळे माझा चांगलाच पचका झाला होता. माझा अपेक्षा आणि हट्ट लक्षात घेत मला आई-बाबांनीच एक भेट दिली होती. त्यामुळे माझा पहिला सांता क्लॉज हे माझे आई-बाबा होते".
क्लासमध्ये साजरी करायचो ख्रिसमस- सानिका
आपल्या आठवणीतील ख्रिसमसबद्दल बोलताना सानिका म्हणजेच सानिका मोजार म्हणाली,"शाळेत असताना ट्यूशन टिचरकडे माझा ख्रिसमसचा सण साजरा होत असे. त्यामुळे ख्रिसमसमध्ये आम्ही क्लासमध्ये जोरदार पार्टी करायचो. तर दुसरीकडे आम्ही कुटुंबियांसमवेत माहिम चर्चला जायचो. तिथे प्रेयर्स वगैरे असायचे. मग तिथून आम्ही फिनिक्स मॉलला केलेलं ख्रिसमस स्पेशल सेलिब्रेशन बघायला जायचो. मजा-मस्ती, धमाल, पार्टी करणं याच माझ्या ख्रिसमसच्या आठवणी आहेत". ती पुढे म्हणाली,"मी चित्रपटांत वगैरे पाहिलं होतं की, लहान मुलं झोपल्यानंतर त्यांचे आई-बाबा उशीखाली भेट ठेवतात. त्यामुळे २४ डिसेंबरला मीपण खूप अपेक्षा ठेवून झोपायचे की उद्या सकाळी मला काहीतरी मिळणार आहे. पण सकाळी उठून मी पाहायचे तर काही नसायचं. माझा पचका व्हायचा. मी बाबांना सांगायचे की मला सांताने काही भेट दिलेली नाही. मग बाबा मला चॉकलेट द्यायचे. त्यामुळे बाबा माझा सांता आणि चॉकलेट माझं सांताने दिलेलं भेट असायचं".