"आजीला पॅरालिसिसचा अटॅक आला, सगळ्यांना विसरली...", 'सावळ्याची जणू सावली' फेम सावलीने सांगितला भावुक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:55 IST2025-10-07T11:54:31+5:302025-10-07T11:55:02+5:30
सध्या जिकडेतिकडे झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकरची लाडकी आजीही तिला भेटायला आली होती.

"आजीला पॅरालिसिसचा अटॅक आला, सगळ्यांना विसरली...", 'सावळ्याची जणू सावली' फेम सावलीने सांगितला भावुक प्रसंग
सध्या जिकडेतिकडे झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. नुकताच हा सोहळा पार पडला ज्यातील काही क्षण झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आले आहेत. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात कलाकारांना खास सरप्राइज मिळणार आहे. कलाकारांचे कुटुंबीय झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावणार आहेत. याचे खास क्षण समोर आले आहेत. 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकरची लाडकी आजीही तिला भेटायला आली होती.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्राप्तीला खास सरप्राइज मिळाल्याचं दिसत आहे. प्राप्तीच्या डोळ्यावर आदिनाथ कोठारे पट्टी बांधत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर तिच्या आजीची मंचावर एन्ट्री होते. आजीला बघताच प्राप्ती भावुक झाल्याचं दिसत आहे. आजीला घट्ट मिठी मारल्यानंतर तिला अश्रूही अनावर होतात. आजीसोबतचा एक भावुक किस्साही प्राप्तीने प्रेक्षकांसोबत शेअर केला.
प्राप्ती म्हणते, "माझ्या नानीला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. तेव्हा ती कोणालाच ओळखत नव्हती. फक्त मला ओळखत होती. यावरुनच तुम्हाला तिचं माझ्यासाठीचं असलेलं प्रेम कळेल". आजी-नातीचं प्रेम पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावल्याचं दिसत आहे. झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात हे खास क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.