"त्यांना साधं शुद्ध मराठी बोलता येत नाही", 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीचं भयाण वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:31 IST2025-05-29T15:31:12+5:302025-05-29T15:31:34+5:30

अनेक नव्या चेहऱ्यांना मालिकेत काम करण्याची संधी मिळते, मात्र त्यांना नीट मराठी भाषाही बोलता येत नसल्याने 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेता रोहन पेडणेकर याने खंत व्यक्त केली आहे. 

savlyachi janu savali fame actor rohan pednekar shared post on marathi tv industry | "त्यांना साधं शुद्ध मराठी बोलता येत नाही", 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीचं भयाण वास्तव

"त्यांना साधं शुद्ध मराठी बोलता येत नाही", 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीचं भयाण वास्तव

मराठी मालिकांमध्ये संधी मिळाल्यामुळे आज कित्येक नवे आणि टॅलेंटेड चेहरे मराठी सिनेइंडस्ट्रीला मिळाले. मालिकांमुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. घरोघरी पाहिल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये काम केल्याने कलाकार लोकप्रिय झाले आणि त्यांची प्रगतीही झाली. मात्र पूर्वीसारखी इंडस्ट्री आता राहिलेली नाही. अनेक नव्या चेहऱ्यांना मालिकेत काम करण्याची संधी मिळते, मात्र त्यांना नीट मराठी भाषाही बोलता येत नसल्याने 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेता रोहन पेडणेकर याने खंत व्यक्त केली आहे. 

रोहनने त्याच्या फेसबुकवरुन एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने इंडस्ट्रीच भयान वास्तव आणि सत्य परिस्थिती सांगणारा एक किस्सा शेअर केला आहे. रोहन त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, "हल्लीच एका मालिकेची मुख्य अभिनेता म्हणून स्टोरी केली.  त्या कथेसाठी मुख्य पात्र ५ ते ६...त्यातील काही कलाकार खरंच धन्यवाद होते. खरं तर न राहवून ही पोस्ट लिहितोय. कारण खूप त्रास होतोय. गेली १५-२० वर्षे थिएटर, मालिका या क्षेत्रात वावरतोय. पण सध्या चित्र भयानक दिसतंय. कारण, काम करणारे काही कलाकार हे या क्षेत्राला हलक्यात घेतायत. हे काय मी असं करेन...मला इजी जमेल... व्यक्तीरेखेचा अभ्यास नाही, स्क्रिप्टचं वाचन नाही, साधं शुद्ध मराठी बोलता येत नाही. शुद्ध मराठी जाऊदे त्या त्या पात्रांची भाषाही बोलता येत नाही". 

पुढे तो म्हणतो, "एका महाभागाच वाक्य होतं… “मी त्याच मुलीशी लग्न करणार” हा महाशय म्हणतोय “मी त्याच मुलगीशी लग्न करणार”. अनेक टेक झाले. दिग्दर्शक समजावून दमले. कसा बसा फायनल टेक घेतला. त्यानंतर हा नट मला विचारतोय की मुलगी हा शब्दच नसतो का?  मी डोक्यावर हात मारला आणि म्हणालो "मित्रा तुला प्रचंड वाचायचंय...वाचशील तर वाचशील".
 
"व्याकरण, भाषा, वाक्यप्रचार, वाक्यरचना यांचा काहीही अभ्यास नसलेली स्वतःला अभिनेता-अभिनेत्री म्हणून मिरवणारी ही पिल्लावळ वाढत चाललीय. माझी या क्षेत्रात महत्त्वाच्या पदी असणाऱ्या  मान्यवरांना विनंती आहे. खूप खूप चांगले कलाकार हल्ली घरी बसून आहेत. ज्यांनी अनेक वर्षे थिएटर (एकांकिका-नाटक) यात यश संपादन आणि अविरत काम करत आहेत. कृपया अशा गरजूंना संधी द्या. बऱ्याच ठिकाणी असा वाईट अनुभव येतोय. काही ठिकाणी खरंच खऱ्या कलाकारांची दखल-कदर केली जाते. पण काही ठिकाणी अभिनेता असलेल्याच अभिनय करणाऱ्या कलाकारांना उगाचच डोक्यावर बसवलं जातंय. अशाने खरे कलाकार संपले जातायत...संपवले जातायत...मारले जातायत... ", असं म्हणत रोहनने खंत व्यक्त केली आहे. 

Web Title: savlyachi janu savali fame actor rohan pednekar shared post on marathi tv industry