"हेच पाहिजे! आयुष्यभर हेच पाहिजे" चाहत्याच्या 'तो' मेसेज वाचून संकर्षण कऱ्हाडे भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:21 IST2025-11-02T10:21:11+5:302025-11-02T10:21:32+5:30
संकर्षण कऱ्हाडेने चाहत्यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत एक भावुक पोस्ट लिहली.

"हेच पाहिजे! आयुष्यभर हेच पाहिजे" चाहत्याच्या 'तो' मेसेज वाचून संकर्षण कऱ्हाडे भावुक
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमी चर्चेत येत असतो. त्याने सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातून रसिकांच्या मनावर छाप सोडली आहे. संकर्षण सध्या नाटकांद्वारे मराठी रंगभूमीवर काम करत आहे. 'नियम व अटी लागू' हे संकर्षणचं नाटकं मराठी रंगभूमीवर हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहेत. संकर्षण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. 'नियम व अटी लागू' याच नाटकाच्या निमित्ताने आलेल्या एका चाहत्याच्या मेसेजने संकर्षणला अक्षरशः भारावून टाकले आहे आणि त्याने यावर एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
संकर्षणला त्याच्या एका चाहत्यानं सोशल मीडियावर आईच्या वाढदिवसानिमित्त तिला तुझं 'नियम व अटी लागू' हे नाटक दाखवत असल्याचा मेसेज केला. या मेसेजचा स्क्रिनशॉट संकर्षणनं शेअर केलाय. ज्यामध्ये रोहन भिंगारदिवे नावाचा त्याचा चाहता म्हणतो, "'हॅलो संकर्षण, उद्या माझ्या आईचा ६० वा वाढदिवस आहे. तिच्यासाठी उद्या एक सरप्राइज प्लॅन केले आहे. तिला तुझे काम खूप आवडते, म्हणूनच उद्या तिला आणि तिच्या लहानपणीच्या मैत्रिणींना 'नियम व अटी लागू' हे नाटक पाहण्यासाठी बालगंधर्व, पुणे याठिकाणी पाठवत आहे. आई उद्या जवळपास ३६ वर्षांनी नाटक बघायला येणार आहे. आशा करतो तिला हे सरप्राइज आवडले. तुला उद्याच्या प्रयोगासाठी शुभेच्छा".
अनेक वर्षांनी केवळ आपल्या अभिनयामुळे एखादी आई नाटक बघायला येत आहे, हे पाहून संकर्षण भावुक झाला. त्याने म्हटलं, "खरं सांगू? कधी कधी खूप दमायला होतं, एनर्जी कुठून आणू असा प्रश्नंही पडतो, चिडचिड होते, आत्ता मला कुणी नको असा संताप होतो... पण... पण... असा एक मेसेज सोशल मीडियावर येतो की, कुणीतरी आपल्या आईच्या ६० व्या वाढदिवसाला तिला गिफ्टं म्हणून 'माझं नाटक दाखवतंय' आणि अनेक वर्षांनंतर ती आई हा कलाकार आवडतो म्हणुन यायला तयार होते... सगळं बाजूला राहातं आणि असा विचार येतो की, असा प्रयोग व्हावा की अनेक वर्षं पोरांनी आपल्या आईला आणि आईने पोरांना म्हणावं 'जा ह्या कलाकाराचं नाटक बघून ये'. काय पाहिजे? हेच पाहिजे! आयुष्यभर हेच पाहिजे!".