'थोडं तुझं आणि थोड माझं' मालिकेत झळकणार समीर परांजपे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:04 IST2024-05-29T17:03:38+5:302024-05-29T17:04:32+5:30
Sameer Paranjape : गोठ, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता समीर परांजपे लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे.

'थोडं तुझं आणि थोड माझं' मालिकेत झळकणार समीर परांजपे
गोठ, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे. तो थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तो तेजस प्रभू उर्फ तेजा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
तेजस प्रभू हा स्वातंत्र्य सूर्य या वर्तमानपत्राचे संपादक भास्कर प्रभू यांचा नातू आहे. स्वातंत्र्य सेनानींचा वारसा लाभलेल्या आपल्या घराण्याचा तेजसला खूप अभिमान आहे. प्रभूंचा पारंपरिक वाडा जपण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. मात्र त्याच्या वहिनीला तेजसला हरवून प्रभू निवासाचा ताबा मिळवायचा आहे. प्रभू कुटुंबाची शान समजली जाणारी ही वास्तू तेजस वाचवू शकेल का? यात त्याला कोणाची साथ मिळणार? हे मालिकेत पाहायला मिळेल.
तेजसची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी समीर खूप उत्सुक आहे. याबद्दल तो म्हणाला, ‘तेजस ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तो खोडकर आहे. त्याला कुणी डिवचले तर तो आपले म्हणणे खरे करण्यासाठी वाट्टेल ते करु शकतो. मालिकेचे नाव आणि गोष्ट खूपच भावली मला. कोणतेही नाते एकतर्फी असून चालत नाही. थोडं तुझं आणि थोडं माझं करतच नाते टिकवावे लागते. त्यामुळे प्रत्येक वयोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल. शिवानी सुर्वेसोबत मी पहिल्यांदा काम करतोय. काम करताना खूप मजा येतेय. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं १७ जूनपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’