"योग्य 'वेळ' आली की दुरावलेली फॅमिली एक व्हायला..." ठाकरे बंधूंवरील पोस्टनं वेधलं लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:25 IST2025-07-04T17:24:55+5:302025-07-04T17:25:56+5:30
'ठाकरे' एकत्र मंचावर, आणि 'फॅमिलीची गंमत' रंगमंचावर... 'ती' पोस्ट चर्चेत!

"योग्य 'वेळ' आली की दुरावलेली फॅमिली एक व्हायला..." ठाकरे बंधूंवरील पोस्टनं वेधलं लक्ष!
येत्या ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईतील विजयी मेळावा होणार आहे. अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकाच मंचावर येत असल्याने या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि मनसेकडून हिंदी सक्तीविरोधात विजयी मेळावा आयोजित केला जाणार आहे. दोन्ही बंधुंनी या मेळाव्याकडे राजकीय लेबल न लावता मराठी भाषेचा विजय म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. तब्बल १८ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर भाषण करताना पाहायला मिळतील. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अशातच आता एक पोस्ट चर्चेत आली आहे.
'हीच खरी फॅमिलीची गंमत' या नाटकाच्या इन्स्टाग्राम हॅडलवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , उद्धव आणि राज ठाकरे यांचं Ghibli Art पोस्टर शेअर केलाय. ज्यात लिहलेलं आहे, "'योग्य 'वेळ' आली की दुरावलेली फॅमिली एक व्हायला 'वेळ' लागत नाही. हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. जराही राजकारण नसलेल शुद्ध FAMILY ENTERTAINMENT". ठाकरेंचा मेळावा आणि नाटकाची थीम यावर आधारित शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. ही पोस्ट मराठी अभिनेता सागर कांरडेला टॅग केलेली आहे.
'हीच खरी फॅमिलीची गंमत' या नाटकात अभिनेता सागर कांरडे हा मुख्य भूमिकेत आहे. या नाटकाचा उद्या दादरमध्ये प्रयोग होणार आहे. या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन संतोष पवारनं केलं आहे. तसेच ते या नाटकात भूमिकाही साकारत आहे. समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही व्यंग आहे. अशातच त्या कुटुंबांमध्ये एक लव्ह स्टोरी सुरू होते. पुढे त्या लव्ह स्टोरीचं काय होतं? कशा प्रकारे या दोन कुटुंबांमध्ये सोयरिक जुळून येते? आणि ते घडताना काय धमाल उडते? हे या नाटकात पाहायला मिळतं.