नाशिकच्या तपोवनातील १८०० झाडांच्या कत्तलीवर सचिन गोस्वामींनी उठवला आवाज, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:33 IST2025-11-24T13:31:32+5:302025-11-24T13:33:19+5:30
दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी तपोवनातील वृक्षतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकच्या तपोवनातील १८०० झाडांच्या कत्तलीवर सचिन गोस्वामींनी उठवला आवाज, म्हणाले....
Tapovan Tree Cutting Controversy : नाशिक शहरात २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. देशभरातील संत, महंत आणि लाखो भाविक या पवित्र सोहळ्यासाठी नाशिकला भेट देणार आहेत. साधू-महंतांच्या तात्पुरत्या 'साधुग्राम' निवाऱ्यासाठी तपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. साधू-महंतांच्या निवाऱ्यासाठी मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक असले तरी, प्रशासनाच्या या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पर्यावरणप्रेमी संघटना आधीच यावर टीका करत असताना, आता लोकप्रिय दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही झाडांच्या कत्तलीवर संताप व्यक्त केलाय.
सचिन गोस्वामी यांनी या वृक्षतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सचिन गोस्वामींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "कुंभ मेळ्यातील साधू संताना तपोवनात राहूटी उभारून व्यवस्था करा... श्रीराम तसेच राहिले होते ना? १८०० झाडं का कापायची?", या मोजक्याच शब्दात त्यांनी सरकारला थेट सवाल केलाय.
कुंभमेळ्यादरम्यान साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात तात्पुरते साधुग्राम उभारण्याची तयारी सुरू आहे. याच व्यवस्थेसाठी १,८२५ वृक्षांची तोड केली जाणार आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या झाडांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, ती तोडण्यापूर्वी नियमानुसार त्या झाडांवर पिवळ्या रंगाच्या फुल्या मारून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडेल, या भीतीपोटी अनेक वृक्षप्रेमी संघटनांकडून या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे. या विराेधात तब्बल ९०० हुन अधिक हरकती दाखल झाल्या आहेत.