"अत्यंत सुंदर रस्ता...", घोडबंदर रोडवरुन ऋतुजा बागवेचा प्रताप सरनाईकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:10 IST2025-10-07T13:09:02+5:302025-10-07T13:10:02+5:30
वाहतुक कोंडी आणि घोडबंदर रोडच्या दुरवस्थेमुळे शूटिंगला पोहोचायला उशीर झाल्याचं जुई गडकरी, सुरभी भावे, रुपाली भोसले, मिलिंद फाटक यांनी याआधीही सांगितलं आहे. आता अभिनेत्री ऋतुजा बागवेने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

"अत्यंत सुंदर रस्ता...", घोडबंदर रोडवरुन ऋतुजा बागवेचा प्रताप सरनाईकांना टोला
मुंबईसारख्या शहरात सर्वसामान्यांना अनेकदा वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागतं. अनेक कलाकारही याबद्दल तक्रार करताना दिसतात. रस्त्यावरील खड्ड्यांबाबतही अनेक सेलिब्रिटीही पोस्ट करतात. ठाण्यातील घोडबंदर रोडबाबतही सतत तक्रारी येताना दिसतात. या रस्त्याची दुरवस्था, वाहतुककोंडी हा काही नवा मुद्दा नाही. अनेकदा या रस्त्यावरुनच कलाकारांना त्यांचं शूटिंगचं ठिकाण गाठावं लागतं. वाहतुक कोंडी आणि घोडबंदर रोडच्या दुरवस्थेमुळे शूटिंगला पोहोचायला उशीर झाल्याचं जुई गडकरी, सुरभी भावे, रुपाली भोसले, मिलिंद फाटक यांनी याआधीही सांगितलं आहे. आता अभिनेत्री ऋतुजा बागवेने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
ऋतुलाजाही घोडबंदर रोडवरुन जाताना इतर कलाकारांसारखाच अनुभव आला आहे. ऋतुजाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने प्रताप सरनाईकांना टोलाही लगावला आहे. "अत्यंत सुंदर रस्ता, घोडबंदर रोड...पाठीचा मणका अजून शाबुत आहे, म्हणून साष्टांग नमन", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ऋतुजाने प्रताप सरनाईक यांनाही टॅग केलं आहे.
दरम्यान, ऋतुजा बागवे हा मराठी सिनेसृष्टीचा लोकप्रिय चेहरा आहे. ऋतुजाने अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिचं अनन्या हे नाटक लोकप्रिय ठरलं होतं. 'नांदा सौख्यभरे' या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. तर 'माती से बांधी डोर' या हिंदी मालिकेतही ती झळकली होती.