"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:13 IST2025-10-09T17:12:46+5:302025-10-09T17:13:08+5:30
सोशल मीडियावरुन पोस्ट करत रुपालीने या अपघाताबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. आता तिने पहिल्यांदाच हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दल मुलाखतीत सांगितलं आहे.

"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा असलेल्या रुपाली भोसलेच्या गाडीचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला. या अपघातातून रुपाली थोडक्यात बचावली होती. सोशल मीडियावरुन पोस्ट करत रुपालीने या अपघाताबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. आता तिने पहिल्यांदाच हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दल मुलाखतीत सांगितलं आहे.
रुपालीने नुकतीच मराठी मनोरंजन विश्वला मुलाखत दिली. अपघाताबद्दल रुपाली म्हणाली, "घोडबंदर रोडलाच माझ्या गाडीचा अपघात झाला. कंटेनर मागे येत होता. माझी गाडी त्याच्यामागे होती. आणि माझ्या गाडीच्या मागे अजून एक कंटेनर होता. स्वामींची कृपा की तो कंटेनर खूप फोर्सने मागे आला नाही. कारण तो उतार होता. जर वेगाने कंटेनर मागे आला असतं तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं. माझ्यावर येणारं संकट गाडीने घेतलं. आता गाडी वर्कशॉपमध्ये आहे. पण वाईट वाटलं. कारण, खूप कष्टाने घेतलेली गाडी...गाडीच नाही तर कुठल्याही वस्तूला असं झालं तरी आपल्याला वाईट वाटतंच. पण, त्या दिवशी वाईट दिवस होता".
रुपालीने जानेवारी महिन्यात मर्सिडीज कंपनीची नवी कोरी गाडी खरेदी केली होती. या गाडीचा २९ सप्टेंबरला अपघात झाला. सध्या रुपाली 'लपंडाव' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत रुपाली सरकार ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती.