'रामायण'मधील तो मुस्लिम अभिनेता; एक-दोन नाही, ११ भूमिका साकारल्या, आज काय करतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:48 IST2026-04-02T15:47:20+5:302026-04-02T15:48:15+5:30
Ramanand Sagar's Ramayan: रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत अनेक भूमिका साकारल्या; पण हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही.

'रामायण'मधील तो मुस्लिम अभिनेता; एक-दोन नाही, ११ भूमिका साकारल्या, आज काय करतो?
Ramanand Sagar's Ramayan: भारतीय दूरदर्शन इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने अनेक कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मात्र या मालिकेत एक असा कलाकार होता, ज्याने एक-दोन नव्हे तर तब्बल ११ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, तरीही त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. हा कलाकार म्हणजे अभिनेते असलम खान.
रामायणमधील बहुगुणी कलाकार
मुस्लिम कुटुंबातून आलेल्या असलम खान यांनी रामायणमध्ये समुद्र देव, ऋषी-मुनी आणि अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिका त्यांनी वेगळ्या शैलीत आणि प्रभावी संवादफेकीने साकारली. त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षक आजही आश्चर्यचकित होतात. विशेष म्हणजे, असलम खान यांना सुरुवातीला अभिनेता बनायचे नव्हते. ते खासगी क्षेत्रात नोकरी शोधत होते. अभिनय क्षेत्रात त्यांची एंट्री योगायोगाने ‘विक्रम आणि बेताल’ या मालिकेतून झाली.
योगायोगाने मिळाली रामायणमध्ये संधी
रामायणमध्ये त्यांची निवडही एका योगायोगामुळे झाली. समुद्र देवाच्या भूमिकेसाठी निवडलेला अभिनेता शेवटच्या क्षणी काम करण्यास नकार दिल्याने पर्याय म्हणून असलम खान यांना बोलावण्यात आले. त्यांच्या दमदार आवाजाने आणि संवादफेकीने रामानंद सागर प्रभावित झाले आणि त्यांना पुढे अनेक भूमिका देण्यात आल्या. पुढे त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘श्री कृष्णा’ आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केले.
अखेर अभिनयाला केले अलविदा
मोठ्या आणि लोकप्रिय मालिकांमध्ये काम करूनही असलम खान यांना अपेक्षित प्रमाणात काम आणि ओळख मिळाली नाही. इंडस्ट्रीतील मर्यादित संधी आणि अनिश्चिततेमुळे त्यांनी २००२ साली अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. आज ते उत्तर प्रदेशातील झाशी येथे साधे जीवन जगत असून, एका मार्केटिंग कंपनीमध्ये काम करतात. २०२० मध्ये लॉकडाउनदरम्यान रामायणचे पुनःप्रसारण झाले, तेव्हा सोशल मीडियावर त्यांच्या अभिनयाची पुन्हा चर्चा सुरू झाली होती.