प्रिया मराठेची सोशल मीडियावर 'ही' होती शेवटची पोस्ट, गेल्या एका वर्षापासून अभिनेत्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 11:43 IST2025-08-31T11:43:13+5:302025-08-31T11:43:44+5:30

प्रिया मराठेचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले.

Priya Marathe Passed Away At Age Of 38 After Battling Cancer Last Post One Year Ago | प्रिया मराठेची सोशल मीडियावर 'ही' होती शेवटची पोस्ट, गेल्या एका वर्षापासून अभिनेत्री...

प्रिया मराठेची सोशल मीडियावर 'ही' होती शेवटची पोस्ट, गेल्या एका वर्षापासून अभिनेत्री...

Priya Marathe Passes Away: मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचे आज (३१ ऑगस्ट) सकाळी निधन झाले. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आलेल्या या बातमीने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. पण ही लढाई अपयशी ठरल्याने तिची प्राणज्योत मालवली. 

प्रिया मराठे गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर विशेष सक्रिय नव्हती. तिनं ११ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पती शंतनू मोघे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. हीच तिची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट ठरली. तिच्या या अकाली जाण्याने तिच्या चाहत्यांना आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.

प्रिया मराठेनं नाटक, मालिका, चित्रपट सर्व माध्यमांवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सकारात्मक, ऐतिहासिक, नकारात्मक भूमिका तिने सुंदर पद्धतीने साकारल्या आहेत. आतापर्यंत तिने अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. 'या सुखांनो या', 'चार दिवस सासूचे', 'पवित्र रिश्ता' आणि 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या मालिकांमधून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मालिकांसोबतच तिनं 'विघ्नहर्ता महागणपती' (२०१६) आणि 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.


प्रियानं २४ एप्रिल २०१२ रोजी अभिनेते श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव शंतनू मोघे यांच्याशी विवाह केला होता. प्रियाच्या निधनानं शंतनू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आज दुपारी चार वाजता मीरा रोड येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी चाहते आणि सहकलाकार प्रार्थना करत आहेत.

Web Title: Priya Marathe Passed Away At Age Of 38 After Battling Cancer Last Post One Year Ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.