'पिंगा गर्ल्स'पैकी प्रेरणा आता आई होणार, एक नवा पाहुणा येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:01 IST2025-10-29T19:01:40+5:302025-10-29T19:01:55+5:30
Pinga Ga Pori Pinga Serial : 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका आता एका नव्या आणि खास टप्प्यात येणार आहे. या मालिकेत नेहमीच आधुनिक स्त्रियांचा आत्मविश्वास, त्यांची स्वप्नं आणि मैत्री दाखवली गेली आहे.

'पिंगा गर्ल्स'पैकी प्रेरणा आता आई होणार, एक नवा पाहुणा येणार
कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका 'पिंगा गं पोरी पिंगा' आता एका नव्या आणि खास टप्प्यात येणार आहे. या मालिकेत नेहमीच आधुनिक स्त्रियांचा आत्मविश्वास, त्यांची स्वप्नं आणि मैत्री दाखवली गेली आहे. आता पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात नवा आनंद येणार आहे आणि सुखाची चाहूल लागणार आहे कारण पिंगा गर्ल्सपैकी एक मैत्रीण प्रेरणा आई होणार आहे. स्वतःच्या करिअरमध्ये पुढं गेलेली, आत्मनिर्भर आणि स्वप्नाळू प्रेरणाला आता मातृत्वाचं सुख लाभणार आहे. तिने दिलेल्या या गोड बातमीमुळे बाकीच्या सगळ्या मैत्रिणींच्या आनंदाला उधाण आलंय, पण या आनंदातही इंदू वल्लरीला म्हणते, ''प्रेरणेला बाळ होणार, पण तुला नाही म्हणजे काहीतरी कमी आहे तुझ्यात.'' या बोलण्यावरून वल्लरी आणि मनोज खूप अस्वस्थ होणार आहे.
या सगळ्यात पिंगा गर्ल्स पुन्हा एकत्र येतात प्रेरणाच्या या नव्या प्रवासात तिच्या पाठीशी उभं राहण्यासाठी. त्यांचं हे एकत्र येणं, एकमेकींना दिलेला आधार आणि खरी मैत्री यामुळे मालिकेत पुन्हा एकदा भावनिक रंग भरणार आहेत. पण या सगळ्या भावनिक क्षणांच्या पार्श्वभूमीवर अजून एक गोष्ट घडताना दिसणार आहे. काय असेल ही गोष्ट? त्याचा पिंगा गर्ल्सच्या आयुष्यावर कोणता परिणाम होणार? वल्लरी त्यातून कसा मार्ग काढणार हळूहळू उलघडेलच.
या सगळ्यात मिठू अचानक परतल्याने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. एका बाजूला प्रेरणाचं मातृत्व, दुसऱ्या बाजूला वल्लरीची लढाई आणि मिठूचं पुनरागमन या सगळ्यामुळे 'पिंगा गर्ल्स'चे पुढील भाग भावनिक आणि प्रेक्षकांना स्क्रीनसमोर खिळवून ठेवणारे ठरणार आहेत.