'सावळ्याची जणू सावली'मधील प्राप्ती रेडकरने चाळीतल्या दिवाळीच्या आठवणींना दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:22 IST2024-10-31T15:20:57+5:302024-10-31T15:22:12+5:30
Prapti Redkar : 'सावळ्याची जणू सावली' (Sawalyanchi Janu Sawali) मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहेत. या मालिकेत सावलीची भूमिका प्राप्ती रेडकर हिने साकारली आहे.

'सावळ्याची जणू सावली'मधील प्राप्ती रेडकरने चाळीतल्या दिवाळीच्या आठवणींना दिला उजाळा
'सावळ्याची जणू सावली' (Sawalyanchi Janu Sawali) मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहेत. या मालिकेत सावलीची भूमिका प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) हिने साकारली आहे. नुकतेच प्राप्तीने लहानपणीच्या दिवाळीची आठवण सांगताना चाळीतल्या गमतीजमती सांगितल्या.
प्राप्ती रेडकर म्हणाली की,"आम्ही आधी चाळीत राहायचो आणि चाळीतले सर्व मित्र-मैत्रिणी एक स्पर्धा लावायचो की जो दिवाळीच्या दिवशी पहाटे सर्वात पहिला उठेल तो जिंकणार, म्हणजे काही बक्षीस नाही मिळायचे फक्त आनंद मिळायचा. कसं कळायचं तर फटाक्याचा आवाज आला कि समजून जायचे कोणीतरी उठलंय. मी त्या स्पर्धेत ३-४ वेळा जिंकली आहे. ती मज्जाच वेगळी होती. मग सर्वांनी एकत्र फटाके फोडायचे, शेजाऱ्यांकडे फराळही करायला जायचे. चाळीतल्या दिवाळीची मज्जाच वेगळी आहे. आता आम्ही तिथे राहत नाही पण माझी आजी तिथेच राहते तर मी तिथे दिवाळी साजरी करायला जाते पण आता तशी मस्ती-मज्जा नाही होत आणि मी ती मज्जा मस्ती खूप मिस करते. माझ्या आयुष्यातले सोनेरी दिवस होते ते.
मी बेसनाच्या लाडूसारखी आहे
ती पुढे म्हणाली की, दिवाळीमध्ये जो तडतडणारा पाऊस असतो तशी रंगबेरंगी आहे मी, कारण मी फार बडबड करत असते. मी बेसनाच्या लाडूसारखी आहे. बेसन लाडू खूप जणांना आवडतो तसंच माझं आहे की जिथे जाते तिथे लोक माझ्यावर प्रेम करतात. हे मी स्वतःच कौतुक म्हणून सांगत नाही पण असं मी अनुभवले आहे. आता मी जी मालिका करत आहे 'सावळ्याची जणू सावली' तिथे ही मी सर्वांची लाडकी झाली आहे. असा एकही कलाकार नाही जो माझ्याबद्दल वाईट बोलतो. माझ्यासाठी छान खाऊ आणतात, मला गिफ्ट्स ही देतात म्हणून मला वाटत की मी बेसन लाडू सारखी आहे.