'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका रंजक वळणावर, सुरु होणार वल्लरीचा नवा लढा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 19:12 IST2025-05-03T19:11:46+5:302025-05-03T19:12:05+5:30
'Pinga Ga Pori Pinga' series : पिंगा गं पोरी पिंगा मालिकेमध्ये मिठूवर झालेल्या हल्ल्याची केस सध्या निर्णायक टप्प्यावर आहे.

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका रंजक वळणावर, सुरु होणार वल्लरीचा नवा लढा!
कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा ('Pinga Ga Pori Pinga' series) मालिकेमध्ये मिठूवर झालेल्या हल्ल्याची केस सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. वल्लरीच्या प्रयत्नांमुळे श्वेताला जामीन मिळाला असला तरी खरी लढाई आता सुरू होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये वल्लरी शपथ घेताना दिसतेय की आता श्वेताताईंची निर्दोष सुटका करणार ॲड. वल्लरी मनोज भांबरे. वल्लरीच्या या लढ्यात तिला मनोज आणि पिंगा गर्ल्सची साथ मिळणारच पण ती ही शिवधनुष्य कसं पेलणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
मिठूवर झालेल्या हल्ल्याचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. हल्लेखोराचा शोध घेणं आणि त्याच्या विरोधात ठोस पुरावे मिळवणं हे वल्लरीसमोरचं प्रमुख ध्येय ठरत आहे. मात्र या लढ्यात तिला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आहे मग ते मनोजचा प्रतिकार असो किंवा युवराजचे गूढ मनसुबे. वल्लरी गावी जाणार असल्याने तेजा नाराज झाली असली, तरी पिंगा गर्ल्समधील मैत्री आणि एकमेकींवरील विश्वास याचं बळ वल्लरीला मिळणार आहे.
खचलेल्या श्वेताला दिलेला धीर, आणि प्रेरणाला मिठूची काळजी घेण्याची विनंती – हे सर्व तिच्या जबाबदारीची जाणीव दर्शवतं. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वल्लरी सत्याच्या शोधाचा, मिठूला न्याय मिळवून देण्याचा आणि आपल्या मैत्रीचं खरंखुरं मोल सिद्ध करण्याचा नवीन लढा सुरू करणार आहे.