परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:35 IST2026-01-05T10:34:35+5:302026-01-05T10:35:17+5:30
परेश रावल यांच्यासोबत दिसली 'ही' दिग्गज मंडळी

परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक
अभिनेते परेश रावल हे मराठी नाटकांचे चाहते आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' नाटकाचं कौतुक केलं होतं. तसंच मी आवर्जुन मराठी नाटक पाहायला जातो असंही ते म्हणाले होते. आता नुकतंच मुंबईतील दादर येथे मराठी नाटकांचं फेस्टिवल आयोजित करण्यात आलं होतं. या फेस्टिवलला परेश रावलही आले होते. सर्वसामान्यांमध्ये बसून त्यांनी नाटकाचा आनंद घेतला.
दादरमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मराठी नाटकांचं फेस्टिवल झालं. मराठी तसंच हिंदीतीलही काही रसिक कलाकार मंडळींनी फेस्टिवलला हजेरी लावली. आनंद इंगळे यांच्या 'पॉपकॉर्न' या मराठी नाटकाच्या प्रयोगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रेक्षकांमध्ये परेश रावल बसलेले दिसत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे ते नाटकाचा आनंद घेत आहेत. टाळ्या वाजवत आहेत. त्यांच्या बाजूला गीतकार स्वानंद किरकिरेही आहेत. शिवाय दुसऱ्या बाजूला लेखक-दिग्दर्शक विजय केंकरे बसलेले आहेत. परेश रावल यांची मराठी रंगभूमीसाठी असलेली आत्मियता यातून दिसून येते.
'पॉपकॉर्न' हे नाटक विवेक बेळे यांनी लिहिलं असून याचं दिग्दर्शनही केलं आहे. नाटकात आनंद इंगळेंसह अंबर गणपुले, गायत्री देशपांडे, गौरी देशपांडे, दिप्पी लेले हे कलाकार आहेत. 'पॉपकॉर्न:फॅमिली मॅटर्स' असं नाटकाचं नाव आहे. बंद दरवाज्या आड दडलेलं वादळ अशी नाटकाची लाईन आहे. कौटुंबिक विषयावर नाटक आधारित आहे.