"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
By देवेंद्र जाधव | Updated: June 9, 2025 08:31 IST2025-06-09T08:28:21+5:302025-06-09T08:31:15+5:30
झी मराठीवरील पारु मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत इंडस्ट्रीतील वाईट प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. याशिवाय कोणालाही न घाबरता त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलंय.

"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
'पारू' मालिकेतील लोकप्रिय मराठी अभिनेता शंतनू गांगणेने सोशल मीडियावर मराठी इंडस्ट्रीतील चुकीच्या प्रकाराबद्दल आवाज उठवला आहे. शंतनूने त्याच्या प्रोफाईलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तो म्हणतो, "नमस्कार मी शंतनू शिवाजीराव गांगणे. मराठी चित्रपट व टीव्ही कलाकार, कार्यकारी निर्माता, आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे शहर उपाध्यक्ष आहे. हा व्हिडीओ करण्यामागचं कारण मराठी चित्रपट आणि मालिकाक्षेत्रात सध्या चुकीचा प्रकार सुरु आहे त्याबद्दल..."
"अनेक निर्माते जे आहेत ते कलाकार, कामगार, तंत्रज्ञांचे पैसे बुडवत आहेत. किंवा अत्यंत विलंबाने पैसे देत आहेत. यासाठी मराठी चित्रपटसृष्टीकडे 'मराठी चित्रपट महामंडळ' आहे ज्यांच्याकडे आपण जाऊन तक्रार करु शकतो. पण मालिकाक्षेत्रामध्ये मात्र अशी कोणती संघटना नाही. कामाच्या ९० दिवसानंतर पेमेंट दिलं जातं. ही पद्धत कोणी सुरु केली मला खरंच कल्पना नाही. पण... आपल्यापैकी अनेक कलाकार, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, डिझायनर यांना मानधनासाठी ९० दिवसांनंतरही पैसे मिळत नाहीत, ही सध्याची परिस्थिती आहे. यासाठी कधी १२0 ते १५० दिवस वाट पाहावी लागते."
"पाच-पाच महिने एखाद्याला कामाचे पैसे मिळत नसतील तर त्याने जगणं कसं करायचं. भारत सरकारची जी मायक्रो बिझनेसची स्कीम आहे, त्यात रजिस्टर झालेल्या निर्मात्यांच्या ज्या कंपनी आहेत, त्यांना चॅनल ४५ दिवसांमध्ये पेमेंट देतं. मग ४५ दिवसांमध्ये पेमेंट मिळूनही निर्माते ते पैसे कलाकारांना, तंत्रज्ञांना नव्वद दिवसांपर्यंत का देत नाहीत? हे चुकीचं आहे. याविरोधात मी आवाज उठवतोय."
"हे प्रश्न घेऊन मी ॲड. आशिष शेलार साहेबांना भेटणार आहे. आपलीही अशीच तक्रार असल्यास मला WhatsApp वर तुमची तक्रार माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार साहेब यांच्या नावे अर्ज करून मला १८ जून पर्यंत पाठवावी किंवा माझ्यासोबत यावे ही विनंती. ज्यांना असं वाटतं की, नाव उघड करायचं नाहीये, त्याचीही काळजी घेतली जाईल. तुमचं नाव कुठेही येणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. खरंतर आपण निर्मात्यांना पोशिंदा समजतो, पण त्यांनी जर असं आपल्यासोबत वागलं तर ते चुकीचं आहे."
"ज्यांच्याकडे दुसरे उत्पन्न आहे ते सुदैवी; पण जे पूर्णपणे ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हा प्रकार भीषण आहे. अनेकवेळा त्यांना रक्कम कमी करून घ्यावी लागते, तडजोड करावी लागते, किंवा तक्रार नोंदवली तर काम मिळेल की नाही ही भीती वाटते. कदाचित या व्हिडीओनंतर, या सगळ्या प्रकरानंतर मला काम मिळणं बंद होईल. किंवा मला टाळलं जाईल, पण मला याची चिंता नाही." अशाप्रकारे शंतनूने आवाज उठवून चुकीच्या प्रकारावर बोट ठेवलं आहे.