अंकिता वालावलकरनेच नाही तर 'या' लोकांनी पत्रिकेत नाव टाकूनही सूरज चव्हाणच्या लग्नाकडे फिरवली पाठ, पाहा कोण आहेत ते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:46 IST2025-12-01T10:46:02+5:302025-12-01T10:46:59+5:30
Suraj Chavan wedding : 'बिग बॉस मराठी सीझन ५' चा लाडका विजेता आणि लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला. टिकटॉक रीलपासून 'बिग बॉस'च्या ट्रॉफीपर्यंतचा प्रवास गाजवणाऱ्या सूरजने पुण्याजवळील सासवड येथे मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने संजना गोफणे हिच्याशी लग्न केले.

अंकिता वालावलकरनेच नाही तर 'या' लोकांनी पत्रिकेत नाव टाकूनही सूरज चव्हाणच्या लग्नाकडे फिरवली पाठ, पाहा कोण आहेत ते?
'बिग बॉस मराठी सीझन ५' चा लाडका विजेता आणि लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला. टिकटॉक रीलपासून 'बिग बॉस'च्या ट्रॉफीपर्यंतचा प्रवास गाजवणाऱ्या सूरजने पुण्याजवळील सासवड येथे मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने संजना गोफणे हिच्याशी लग्न केले. संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी असून हे 'अरेंज मॅरेज' आहे. सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर त्याची करवली बनली होती. सूरजच्या लग्नाला बिग बॉस मराठीच्या घरात त्याच्यासोबत असलेल्या काही मोजक्या कलाकारांव्यतिरिक्त अनेक जण गैरहजर राहिले. सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
गरीब कुटुंबातून आलेल्या, पण साध्या स्वभावामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या सूरजच्या लग्नाबद्दल प्रेक्षकांना मोठी उत्सुकता होती. त्याच्या लग्नसोहळ्यापूर्वीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. परंतु, एवढा मोठा टप्पा गाठणाऱ्या सूरजच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणाला काही अत्यंत जवळचे आणि महत्त्वाचे पाहुणे मात्र उपस्थित राहू शकले नाहीत, ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
कोण-कोण राहिले गैरहजर
जिथे अनेक जवळचे लोक गैरहजर राहिले, तिथे 'बिग बॉस'मधील त्याची मैत्रीण जान्हवी किल्लेकर मात्र आवर्जून हजर राहिली. 'बिग बॉस'मध्ये जान्हवीने सूरजला वचन दिले होते की, "तुला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी हजर असेन." तिने ते वचन पाळले. लाडक्या भावाच्या लग्नात जान्हवी नटूनथटून 'करवली' म्हणून मिरवताना दिसली, ज्यामुळे सूरजला मोठा आधार मिळाला. 'बिग बॉस'च्या घरातूनच सूरजला भाऊ मानणारी अंकिता वालावलकर ही लग्नाला गैरहजर होती. तिने लग्नापूर्वी सूरज आणि संजनाचे 'केळवण' केले होते, तसेच खरेदीलाही ती सोबत होती. त्यामुळे तिची अनुपस्थिती अनेकांना खटकली. त्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली.
रितेश देशमुख आणि केदार शिंदेही राहिले अनुपस्थित
'बिग बॉस'च्या मंचावर सूरज आणि होस्ट रितेश देशमुख यांच्यात एक खास आणि भावनिक नाते निर्माण झाले होते. इतकेच नाही तर, रितेशने सूरजची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून त्याला मदत केली होती आणि त्याच्या पहिल्या चित्रपट 'झापुक झुपूक' चा ट्रेलरही लॉन्च केला होता. लग्नपत्रिकेत रितेशचे नाव होतं. पण तो सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो या सोहळ्याला हजेरी लावू शकला नाही. सूरजच्या 'झापुक-झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांचेही सूरजसोबत खास नाते आहे. पण, तेही पुढील चित्रपटाच्या कामात व्यग्र असल्यामुळे लग्नाला येऊ शकले नाहीत.
अजित पवारही या कारणामुळे लग्नाला लावू शकले नाहीत हजेरी
सूरजने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन लग्नाचे निमंत्रण दिले होते. विशेष म्हणजे, लग्नानंतर सूरज ज्या नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे, ते घरही अजित दादांनीच बांधून दिले आहे. मात्र, बीड दौऱ्यामुळे दादांना लग्नाला येता आले नाही. सध्या सोशल मीडियावर सूरज आणि संजनाच्या लग्नाच्या सुंदर फोटोंची धूम आहे. आपल्या नव्या आयुष्याच्या या टप्प्यात सूरजला सगळ्यांकडून खूप शुभेच्छा मिळत आहेत.