निवेदिता आणि अशोक सराफ यांनी मजेशीर प्रश्नांची दिली भन्नाट उत्तरं, सेटवरचा Video व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:51 IST2025-11-18T15:51:06+5:302025-11-18T15:51:45+5:30
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांची ट्युनिंग आणि केमिस्ट्री पाहून सगळेच बोलतात कपल असावं तर असं!

निवेदिता आणि अशोक सराफ यांनी मजेशीर प्रश्नांची दिली भन्नाट उत्तरं, सेटवरचा Video व्हायरल!
Nivedita Saraf-Ashok Saraf: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. नुकतंच निवेदिता सराफ यांनी 'कलर्स मराठी'च्या 'अशोक मा.मा.' या मालिकेत एन्ट्री घेतली आहेत. अशोक सराफ यामध्ये मुख्य भूमिका आधीपासूनच साकारत होते. या दोघांना टेलिव्हिजनच्या स्क्रिनवर एकत्र पाहायला मिळत असल्यानं चाहते आनंदी आहेत. अशातच मालिकेच्या सेटवरील दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
'अशोक मा. मा.' या मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्यात या जोडीने काही मजेशीर प्रश्नांची गमतीशीर उत्तरं दिली आहेत. त्यांच्यातील गोड केमिस्ट्री पाहून चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. व्हिडीओमध्ये या जोडीला काही प्रश्न विचारण्यात आले. पहिला प्रश्न होता, 'सगळ्यात आधी सॉरी कोण बोलतं?' यावर निवेदिता यांनी त्वरित स्वतःकडे बोट केलं. तर अशोक सराफ यांनीही 'निवेदिता' हेच उत्तर दिलं.
पुढे त्यांना विचारलं गेलं, 'सर्वात जास्त विनोदी कोण आहे?' अशोक सराफ यांनी झटपट उत्तर दिलं, 'निवेदिता'. तर निवेदिता यांनी 'अशोक सराफ' म्हटलं. यावर अशोक सराफ यांनी आपल्या खास विनोदी अंदाजात म्हटलं की, "मी विनोद करतो आणि ती विनोदी आहे". 'सगळ्यात जास्त शॉपिंग कोण करतं?' या प्रश्नावर दोघांनी एकमताने 'निवेदिता' हे उत्तर दिलं. 'सर्वात जास्त फोन कोण वापरतं?' हा प्रश्न ऐकताच दोघेही जोरजोरात हसले. निवेदिता म्हणाल्या, "मी फोनवर जास्त बोलते; पण मोबाईल वापरण्याबाबत म्हटलं तर अशोक जास्त मोबाईल वापरतात".
'सगळ्यात छान जेवण कोण बनवतं?' या प्रश्नावर निवेदिता लगेच म्हणाल्या, "सहाजिकच मी… त्यांनी (अशोक सराफ) आयुष्यात चहा बनवण्याशिवाय काही केलं आहे का…". यावर अशोक सराफ यांनी हसून 'हो' म्हटलं. पुढे ते म्हणाले, "मी ते नाकारूच शकत नाही". 'कोणाला खाण्याची जास्त आवड आहे?' यावर पुन्हा अशोक सराफ यांनी त्यांच्या विनोदी शैलीत निवेदिता यांना टोमणा मारला. ते म्हणाले, "मला जेवण खाण्याची सवय आहे. पण, हिला (निवेदिता सराफ) डोकं खाण्याची सवय आहे". हे ऐकून सगळ्यांना हसू आवरलं नाही. तर शेवटचा प्रश्न होता, 'घरचा गृहमंत्री कोण आहे?' या प्रश्नावर निवेदिता सराफ यांनी सहाजिकच मी आहे, असं ठामपणे सांगून गृहमंत्रीपद आपल्याकडेच असल्याचं जाहीर केलं.