निकल निकल...; 'द 50' शोमध्येही आर्या जाधव अन् निक्की भिडल्या, 'बिग बॉस'ची झाली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:48 IST2026-02-02T11:45:19+5:302026-02-02T11:48:51+5:30
हिला शोमधून बाहेर काढू या... निक्की तांबोळीचा पाराच चढला

निकल निकल...; 'द 50' शोमध्येही आर्या जाधव अन् निक्की भिडल्या, 'बिग बॉस'ची झाली आठवण
निक्की तांबोळी आणि आर्या जाधव ही नावं 'बिग बॉस मराठी ५' मुळे चर्चेत आली होती. या सीझनमध्ये एका वादात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली होती. यामुळे आर्याला घराबाहेर काढण्यात आलं होतं. आता या दोन्ही पुन्हा एकदा आमनेसामने आल्या आहेत. जिओ हॉटस्टारवर कालपासून सुरु झालेल्या 'द 50' या रिएलिटी शोमध्ये दुसऱ्याच दिवशी निक्की आणि आर्या यांचं भांडण पाहायला मिळणार आहे.
'द ५०' हा शो नुकताच सुरु झाला असून कालच त्याचा पहिला एपिसोड रिलीज झाला. शोमध्ये एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले आहेत जे एकाच घरात राहणार आहेत. काल सर्व स्पर्धकांमध्ये गेम खेळण्यात आला. त्यातील एक स्पर्धक घराबाहेर गेला. उरलेल्या ४९ स्पर्धकांनी काल घरात प्रवेश केला. तर आज काय घडणार याचा एक प्रोमो आला आहे. यामध्ये निक्की तांबोळी रडताना दिसतेय तर तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल तिची समजूत काढत आहे. इतकंच नाही तर निक्की आणि आर्या यांच्यात चकमक झालेली दिसत आहे. निक्की रडतच अरबाजला म्हणते, 'हे लोक माझ्याबद्दल काय बोलतायेत याने मला फरक पडत नाही.' अरबाज म्हणतो, 'आपल्याला स्मार्ट गेम खेळायचा आहे'. मग आर्या आणि निक्की आमने सामने आलेल्या दिसत आहेत. निक्की आर्याच्या अंगावर धावून म्हणते,'मला हात तर लावून दाखव'. तेव्हा आर्या तिला बोलते, 'निकल एदम निकल..'. निक्की पुढे म्हणते, 'हिला शोमधून बाहेर काढू या'.
निक्की आणि आर्यामधला वाद टोकाला गेलेला दिसत आहे. बिग बॉस प्रमाणेच इथेही दोघी जणी भिडल्या आहेत. आता त्यांच्यात नक्की कोण जिंकतं हे पाहणं महत्वाचं आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये अनेक मराठी चेहरे सहभागी झाले आहेत. निक्की, अरबाज, आर्यासोबत जान्हवी किल्लेकर, शिव ठाकरेही आले आहेत. निक्की, अरबाज आणि जान्हवी सध्या एका टीममधून खेळत आहेत.