'सुख कळले' मालिकेत नवा ट्विस्ट; या प्रसिद्ध अभिनेत्याची झाली एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 17:10 IST2024-06-29T17:10:28+5:302024-06-29T17:10:56+5:30
'सुख कळले' (Sukh Kalale) ही लोकप्रिय मालिका आता रंजक वळणावर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे.

'सुख कळले' मालिकेत नवा ट्विस्ट; या प्रसिद्ध अभिनेत्याची झाली एंट्री
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' (Sukh Kalale) ही लोकप्रिय मालिका आता रंजक वळणावर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. एकीकडे माधवच्या आकस्मिक निधनानंतर मिथिलाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेत ती पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेणार आहे. घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणारी एक खंबीर मिथिला आपल्याला नव्याने पाहायला मिळणार आहे. दरम्यान आता मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे.
'सुख कळले' मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होत आहे. हे पात्र मिथिलाच्या खडतर प्रवासात तिची मदत करेल? की तिचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार? हे पात्र सकारात्मक की नकारात्मक असणार असे अनेक प्रश्न रसिकांना पडले आहेत. त्यामुळे आता 'सुख कळले' मालिकेत पुढे काय होणार, याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. कोण असेल हा नवा चेहरा? कोण येणार मिथिला आणि कामेरकर कुटुंबियांच्या आयुष्यात? हा नवा चेहरा म्हणजे अभिनेता आशय कुलकर्णी.
आशय कुलकर्णी सुख कळले मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या पात्राचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. पण त्याच्या एंट्रीने मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे हे नक्की. आशय अलिकडेच मुरांबा मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत त्याने ग्रे शेड भूमिका केली होती. त्याची मालिकेतून एक्झिट झाली आहे.