'रंग माझा वेगळा'मध्ये नवा ट्विस्ट, कार्तिक आणि दीपा यांचं पुन्हा बहरणार नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 11:03 IST2022-05-11T11:03:09+5:302022-05-11T11:03:30+5:30
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'रंग माझा वेगळा'मध्ये नवा ट्विस्ट, कार्तिक आणि दीपा यांचं पुन्हा बहरणार नातं
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र येणार असून त्यांचे नाते बहरताना दिसणार आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत दीपिका आणि कार्तिकीला दीपा, कार्तिक आई वडील म्हणून हवे आहेत. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी ते सध्या प्रयत्न करत आहेत. यात त्यांना सौंदर्यादेखील मदत करते आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात, सौंदर्या दीपाला घरी बोलवते. तुझी वस्तू द्यायची आहे, असे सांगते. सौंदर्या दीपाला त्यांच्या लग्नाचा अल्बम देते. तो अल्बम दीपा घरी घेऊन येते आणि कार्तिकीच्या हाती लागू नये म्हणून कपाटात ठेवून देते. तर दुसरीकडे कार्तिक आयशाचे ऐकून दीपिकाला खोटे सांगतो. दुसऱ्याच कोणाचा तरी फोटो दाखवून ही तुझी आई आहे, असे सांगतो. तिचे तुझ्या जन्माच्या वेळी निधन झाले. हे ऐकून दीपिकाला खूप वाईट वाटते.
दरम्यान आता मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे, यात पाहायला मिळत आहे की, दिपा आणि कार्तिक मेडिकल कॅम्पमध्ये रुग्णांची सेवा करत आहेत. त्यावेळी दीपा नर्स म्हणून काम करताना दिसत आहे आणि कार्तिकला मदत करताना दिसते आहे. तिथे काम करत असताना त्यांना त्यांच्या लग्नाआधीच्या दिवसांच्या आठवणी ताज्या होणार आहेत. लग्नाआधी ते दोघे एका मेडिकल कॅम्पमध्ये जातात. तिथेच त्यांची चांगली मैत्री झाली होती आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले होते. या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने पुन्हा दीपा आणि कार्तिक यांचे नाते बहरेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.