भाऊ कदमनं बायकोला इंग्रजीत केलं प्रपोज, पाहा ‘किचन कल्लाकार’चा धम्माल प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 15:09 IST2022-01-19T15:09:04+5:302022-01-19T15:09:52+5:30
‘तुला पाहिलं अन् माझ्या मनात फुलपाखरं नाचू लागलीत’, हे वाक्य इंग्रजीत म्हणत बायकोला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करण्याचा टास्क भाऊ कदमला (Bhau Kadam) दिला गेला, पुढे काय झालं बघा...

भाऊ कदमनं बायकोला इंग्रजीत केलं प्रपोज, पाहा ‘किचन कल्लाकार’चा धम्माल प्रोमो
‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kalakar) हा झी मराठीवरील शो सध्या तुफान गाजतोय. भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजवणाऱ्या आणि मनोरंजनाची चव वाढवणारा हा शो अल्पावधीत लोकप्रिय झाला. शोच्या येत्या भागात तर धम्माल होणार आहे. याचे कारण म्हणजे खुद्द ‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदाचा बादशाह भाऊ कदम (Bhau Kadam) या शोमध्ये पत्नीसोबत हजेरी लावणार आहे.
झी मराठी वाहिनीने शोचा नवा प्रोमो रिलीज केला आहे. यात भाऊ कदम बायकोला प्रपोज करताना दिसत आहेत. ते सुद्धा इंग्रजीत. श्रेया बुगडे ही शोची होस्ट भाऊला बायकोला इंग्रजीत प्रपोज करण्याचा टास्क देते. मग काय, भाऊंचं इंग्रजी ऐकून मंचावर हास्याचा स्फोट होतो.
‘तुला पाहिलं अन् माझ्या मनात फुलपाखरं नाचू लागलीत’, हे वाक्य इंग्रजीत म्हणून बायकोला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करण्याचा टास्क भाऊला यावेळी दिला जातो. भाऊ गुलाबाचं फुल घेऊन बायकोसमोर गुडघ्यावर बसतो. पण इंग्रजीत बोलायचं म्हटल्यावर त्याचा पार गोंधळ उडतो. पण शेवटी तो दिलेला टास्क पूर्ण करतोच. भाऊचं इंग्रजीतील हे प्रपोजल ऐकून वहिनीसाहेब लाजल्या नसतील तर नवल.
आज रात्री हा भाग आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. यामध्ये श्रेया आणि भाऊंची धम्माल पाहायला मिळणार आहे. सोबतच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडेसुद्धा उपस्थित आहेत. या भागात भाऊंनी त्याच्या विनोदासारखा खुसखुशीत खमंग असा पदार्थ बनवण्याचा टास्कही दिला जाणार आहे. हा पदार्थ काय तर चकली. आता हा पदार्थ बनवण्यात भाऊ किती यशस्वी ठरतो ते बघूच.