तब्बल ५ वर्षांनंतर नेहा पेंडसेचं टेलिव्हिजनवर कमबॅक, दिसणार या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 19:03 IST2023-09-27T19:03:21+5:302023-09-27T19:03:39+5:30
Nehha Pendse : नेहा पेंडसे बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर होती. मात्र, आता लवकरच ती एका नव्या मालिकेत दिसणार आहे.

तब्बल ५ वर्षांनंतर नेहा पेंडसेचं टेलिव्हिजनवर कमबॅक, दिसणार या मालिकेत
'भाभी जी घर पर हैं' मधील आपल्या सौंदर्याने अभिनेत्री नेहा पेंडसे(Nehha Pendse)ने सर्वांना वेड लावले होते. तिने काही कारणास्तव ही मालिका सोडली होती. तिच्या जागी सौम्या टंडन दिसली होती. त्यानंतर नेहा पेंडसे बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर होती. मात्र, आता लवकरच ती एका नव्या शोमध्ये दिसणार आहे. ही नवीन मालिका म्हणजे 'मे आय कम इन मॅडम'. ही मालिका नुकतीच स्टार भारत वाहिनीवर सुरू झाली आहे.
नेहा पेंडसे हिने इंंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, ''५ वर्षांचा दुरावा आता संपला आहे. मे आय कम इन मॅडमचे नवीन एपिसोड आजपासून तुमचे झाले. मला आशा आहे की तुम्हाला नक्कीच ही मालिका आवडेल. भेटूयात ९.३० वाजता फक्त स्टार भारतवर.'' या मालिकेत नेहा मॅडमच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यात ती ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळणार आहे. नेहाचे चाहते तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
नेहा पेंडसेने तिच्या करिअरमध्ये खूप काम केले आहे. तिने केवळ हिंदीच नाही तर मराठी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. तिने चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला आहे. पण सगळ्यात जास्त लोकप्रिय झाली होती ती संजना हितेशीच्या भूमिकेतून जी तिने 'मे आय कम इन मॅडम?' मध्ये साकारली होती. आता ती स्टार भारतवर प्रसारित होणाऱ्या या शोद्वारे पुनरागमन करणार आहे.
नेहा पेंडसेने लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. १९९९ मध्ये आलेल्या 'प्यार कोई खेल नहीं' या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून डेब्यू केला होता. यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटात दिसली होती. एकता कपूरच्या 'कॅप्टन हाऊस' या शोमधून तिने टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. 'लाइफ ओके' वाहिनीवरील 'मे आय कम इन मॅडम?' मध्ये तिने काम केले. या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली.