Bigg Boss 12: मेघा धाडेनंतर आता ही मराठीमोळी अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 16:06 IST2018-10-29T16:02:03+5:302018-10-29T16:06:40+5:30
बिग बॉसच्या घरात नुकतीच बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेची एंट्री झाली आहे. तिच्यानंतर आता एक मराठमोळी अभिनेत्री बिग बॉसच्या घरात झळकणार आहे.

Bigg Boss 12: मेघा धाडेनंतर आता ही मराठीमोळी अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात
बिग बॉस या कार्यक्रमाच्या यंदाच्या म्हणजेच १२व्या सिझनमध्ये प्रेक्षकांना नेहा पेंडसेला पाहायला मिळाले होते. नेहाने आजवर मराठी, दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ती नुकतीच जॉनी लिव्हरसोबत पार्टनर्स या मालिकेत देखील झळकली होती. नेहा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने ती बिग बॉसच्या घरात असताना तिला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण नुकतेच नेहाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. पण आता ती या कार्यक्रमात पुन्हा एकदा प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
बिग बॉसच्या घरात नुकतीच बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेची एंट्री झाली आहे. तिच्यानंतर आता नेहा घरात एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. नेहा ही बिग बॉस १२ च्या विजेतीपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. पण तिला लोकांची मतं कमी मिळाल्याने तिला बिग बॉसच्या घरा बाहेर जावे लागले. यामुळे तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. नेहा बिग बॉसच्या घरातून इतक्या लवकर बाहेर पडूच शकत नाही असे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. नेहाला बिग बॉसच्या घरात परत घेतले जावे असे तिचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे बिग बॉसच्या निर्मात्यांना सांगत आहेत. सोशल मीडियावरून अनेकांनी नेहाच्या कमबॅकबद्दल प्रतिक्रिया दिल्या असल्याने ती बिग बॉसच्या घरात परतणार असल्याचे वृत्त बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने दिले आहे. नेहाची लोकप्रियता पाहाता तिला बिग बॉसच्या घरात परत प्रवेश देण्याचा निर्णय प्रोडक्शन हाऊसने घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
नेहा बिग बॉसच्या घरात असताना या कार्यक्रमाचा टिआरपी खूपच चांगला होता. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाचा टिआरपी ढासळत चालला आहे. टिआरपी वाढवण्यासाठी नेहाला पुन्हा घरात प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
नेहाने खरंच बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रवेश केला तर प्रेक्षकांना नेहा आणि मेघा या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींना बिग बॉसच्या घरात एकत्र पाहायला मिळणार आहे.