"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:18 IST2025-11-20T10:17:58+5:302025-11-20T10:18:41+5:30
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री सुरभी भावे हिनेदेखील संताप व्यक्त केला आहे.

"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
Nashik Malegaon Crime News: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री सुरभी भावे हिनेदेखील संताप व्यक्त केला आहे.
सुरभीने मालेगाव अत्याचार प्रकरणी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, "आज दिवसभर सतत एकच बातमी डोळ्यासमोर दिसतेय ती म्हणजे मालेगावमध्ये छोट्याशा मुलीवर जो अत्याचार झाला. त्या माणसाने कारण सांगितलं ते असं की त्या मुलीच्या वडिलांसोबत काहीतरी भांडण होतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याने त्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचं आयुष्य संपवलं. काही माणसांच्या अवयवांचा माज वेळीच ठेचायला हवा, तर आणि तरच पुढच्या लोकांना त्याची काहीतरी दहशत राहील. आता जर का आमचे छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी त्याचा चौरंग केला असता. माझी खूप मनापासून इच्छा आहे की त्या माणसाला सुद्धा हाल हाल करून त्याचं आयुष्य संपवण्यात यावं. कारण त्याने जिवंत राहण्यात काही अर्थच नाहीये".
"त्या छोट्याशा बाळाला यातना देऊन त्याला काय आनंद मिळाला. त्याने कुठला बदला घेतला काही कळत नाहीये. पण, लवकरात लवकर त्याला शिक्षा व्हावी ही माझी एका आईची कळकळीची विनंती आहे. मग ते फास्टट्रॅकमध्ये जाऊ दे...सुपरफास्ट असू दे...पण अशा केसेसमध्ये २४ ते ३६ तासांच्या आत निकाल लावला पाहिजे आणि त्या माणसाला निकालात काढलं पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आहे. यासाठी ज्या कोणाकडे अधिकार आहेत त्यांनी प्लीज याच्यावर काहीतरी अॅक्शन घ्या. एखाद्या जिवाशी खेळणं इतकं सोपं नाहीये हे त्यांनाही कळलं पाहिजे. त्या छोट्याशा बाळाला श्रद्धांजली म्हणायला सुद्धा खूप त्रास होतोय", असं म्हणत सुरभीने आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.