'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अनोखा अंदाज, या मंचावर सादर केला हवेतला योग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:03 IST2025-01-31T16:01:56+5:302025-01-31T16:03:18+5:30
'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta Serial) मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अनोखा अंदाज, या मंचावर सादर केला हवेतला योग
स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta Serial) मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी मुक्ता 'आता होऊ दे धिंगाणा' (Aata Hou De Dhingana)च्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार आहे. मुक्ताच्या या सादरीकरणाने मंचावर सर्वांनाच अवाक करुन सोडलं आहे.
मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळेने आपल्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला स्विमिंग आणि योगा असं सत्र चालू असायचे. योगावरच्या याच प्रेमापोटी स्वरदाने म्हैसूर गाठलं आणि महिनाभर अष्टांग योगाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. योगाचे नवनवे प्रकार शिकण्याचा जणू स्वरदाला ध्यास लागला आणि पुण्यातील एका संस्थेतून तिने एरियल योग शिकण्याचं ठरवलं. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग सादर करताना तिच्या मनात थोडं दडपण होतं. मात्र होस्ट सिद्धार्थ जाधव आणि सहकलाकारांनी स्वरदाला प्रोत्साहन दिलं आणि तिने मंचावर अफलातून सादरीकरण केलं.
योगसाधनेने स्वरदाच्या आयुष्याला मिळाली वेगळी कलाटणी
स्वरदाच्या आयुष्यात अभिनयासोबतच योगसाधनेलाही तितकेच महत्त्वाचं स्थान आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही ती योगसाधनेसाठी वेळ काढतेच. योगसाधनेने तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी दिली आहे. प्रत्येकानेच ही कला आत्मसात करायला हवी असं स्वरदाला वाटतं. स्वरदाचा हा हटके अंदाज पाहायचा असेल तर आता होऊ दे धिंगाणाचा एपिसोड पाहावा लागेल.