"मुंबईत जगायचंच म्हणून यातनांनी भरलेला प्रवास...", रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मराठी अभिनेत्याचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:46 IST2025-09-16T13:42:40+5:302025-09-16T13:46:15+5:30
मराठी अभिनेत्यानं ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेवर भाष्य केलंय.

"मुंबईत जगायचंच म्हणून यातनांनी भरलेला प्रवास...", रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मराठी अभिनेत्याचा संताप
मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था ही काही नवीन गोष्ट नाही. पावसाळा असो वा नसो, खड्ड्यांनी भरलेले रस्ते वाहन चालकांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतात. विशेषतः ठाणे-घोडबंदर रोडची स्थिती इतकी वाईट आहे की सामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सगळेच याबद्दल आपला संताप व्यक्त करत आहेत. आता यात मराठीतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद फाटक यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी रस्त्यांच्या या दुरवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी कळकळीची विनंती केली आहे.
मिलिंद फाटक यांनी ठाणे-घोडबंदर रस्ताच्या दुरावस्थेवर 'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. ते म्हणाले, "गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून माझी 'तुला जपणार आहे' मालिका झी मराठीवर सुरू आहे. या मालिकेचे शुटिंग हे ठाणेमधील ओवळा नाक्याला घोडबंदर रोडवर एका स्टुडिओमध्ये सुरू आहे. मी राहतो अंधेरी लोखंडवाला परिसरात, तिथून मी रोज प्रवास करून येथे शूटिंगसाठी येतो. ज्या प्रवासाला फेब्रुवारीपासून सुरुवात झाली, तेव्हा साधारण एक तास लागायचा. पॅकअपनंतर तासाभरात मी घरी पोहचायचो. पण, गेल्या काही दिवसांपासून मी दहिसर मेट्रो करुन मग तिथून रिक्षा करून घोडबंदर मार्गे येत होतो. पण, दिवसेंदिवस इथल्या रस्त्यांची जी काय अवस्था व्हायला लागली आहे, खरं तर अवस्था हा शब्द खूपच साधारण शब्द आहे. खूपच बिकट, भयकंर, जीवघेणा आणि अतिशय यातनांनी भरलेला असा तो प्रवास सुरू झाला होता. कारण, घोडबंदर रोडवर तुम्ही जेव्हा मिरा रोड फाऊंटन हॉटेल सोडता आणि ठाण्याकडे यायला लागता, तर तिथे रस्ता उरलेलाच नाही, फक्त खड्डे आणि खड्डेच आहेत".
मिलिंद फाटक म्हणाले, "मोठे ट्रक्स आणि इतर वाहनांचे चालक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. कारण, सर्वांना पैसे कमवायचे आहेत, काम करायचं आहे आणि मुंबईसारख्या शहरात जगायचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही पर्यायच नाही. आता गेल्या काही दिवसांत माझ्या कानावर एक विनोद येत आहे. तो म्हणजे मी आधी मिरा रोड-घोडबंदर मार्गे येत होतो. मग मी पवई-घाटकोपरमार्गे यायला लागलो. खरं तर त्यात जास्त पैसे लागतात. विनोद असा आहे की आता दुबईमार्गे ठाण्यात येणं सोपं जाणार आहे. हा विनोद सोडून द्या... खरंच या रस्त्याच्या समस्येशी जे कोणी लोक संबंधित आहेत, त्यांनी कृपया या अडचणी दूर करा. कारण, लोकांना ये-जा करण्यासाठी एक चांगला रस्ता मिळणं, हा त्यांचा हक्क आहे. हक्क आहे, हे विधान मी जबाबदारीनं बोलत आहे. कारण, प्रवासासाठी एक चांगला रस्ता उपलब्ध करून देणं, हे सगळ्या संबंधितांचं महत्त्वाचं काम आहे".
पुढे ते म्हणाले, "आता हा कोण मिलिंद फाटक? काय तरी बोलत आहे? कशाला लक्ष द्यायचं? असं बोलून दुर्लक्ष करणार असाल… तर माझं काही म्हणणं नाही. मला प्रवास करायचाच आहे, मला पैसे कमवायचेच आहेत. मला मुंबईसारख्या शहरात जगायचंच आहे. त्यामुळे हा सगळा यातनांनी भरलेला प्रवास करीत मी रोज शूटिंगला येणार. त्या यातनांना विसरून मी प्रेक्षकांचं मनोरंजन करीत राहणार, त्यांना हसवत राहणार, त्यांना रडवत राहणार... जरी मी रडत रडत प्रवास करीत असलो तरी सुद्धा... कृपया या रस्त्यांच्या अवस्थेकडे लक्ष द्या"
मिलिंद फाटक यांनी म्हटलं, "फाऊंटन हॉटेलपासून म्हणजे मीरा भाईंदरच्या टर्नपासून ते ठाणे महानगरपालिकेत जिथपर्यंत रस्ता शिरतो, तिथपर्यंतचा रस्ता दुरुस्त का होत नाही, तो इतका वाईट अवस्थेत का आहे, याची चौकशी करता असं समजलं की त्याचा एक भाग हा मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे येतो. तर दुसरा भाग हा ठाणे महानगरपालिकेकडे येतो आणि याच्यामधला भाग हा एमएमआरडीच्या ताब्यात आहे, जो जंगलामधून जातो. त्यामुळे त्या रस्त्याचं काहीही काम करण्यासाठी जंगल ऑथॉरटीची परवानगी पण लागते. त्यामुळे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे पदाधिकारी तिकडे लक्ष देत नाहीयेत, तसेच एमएमआरडी याविषयी काही करू इच्छिते किंवा त्यांना करता येत नाहीये. खरी अडचण काय आहे, हे जनतेपर्यंत पोहचवणे शासन करणाऱ्या लोकांचं कर्तव्य आहे. इतकी वर्ष कळ काढलेली आहेच, तर अजून एक वर्ष आम्ही कळ काढू. पण, कृपया या रस्त्याकडे लक्ष द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही सगळे आम्हाला ओळखता आणि आम्ही तुम्हाला ओळखतो. कृपया तुमच्या अखत्यारित जे काही करणं शक्य आहे, ते लवकरात लवकर करा. एवढीच विनंती आहे".