Bigg boss marathi 3: 'हे कोणाला धरुन आणलंय'; पहिल्यांदाच स्पर्धकांना पाहून अशी होती महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 19:29 IST2021-12-26T19:29:05+5:302021-12-26T19:29:44+5:30
Bigg boss marathi 3: या रंगतदार सोहळ्यामध्ये 'बिग बॉस मराठी ३' मधील सगळे स्पर्धक सहभागी झाले असून प्रत्येक जण या १०० दिवसांच्या प्रवासाविषयी आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

Bigg boss marathi 3: 'हे कोणाला धरुन आणलंय'; पहिल्यांदाच स्पर्धकांना पाहून अशी होती महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया
गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेला शो म्हणजे 'बिग बॉस मराठी' (Bigg boss marathi 3) . यंदा या शोचं तिसरं पर्व पार पडलं असून आज या शोचा ग्रँड फिनाले म्हणजेच महाअंतिम सोहळा रंगत आहे. या रंगतदार सोहळ्यामध्ये 'बिग बॉस मराठी ३' मधील सगळे स्पर्धक सहभागी झाले असून प्रत्येक जण या १०० दिवसांच्या प्रवासाविषयी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. यामध्येच सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात आता शेवटचे ५ स्पर्धक राहिले आहेत. या मीनल शहा, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील आणि विशाल निकम हे स्पर्धक आहेत. या स्पर्धकांना आज प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाने त्यांची मत मांडली. यामध्येच महेश मांजरेकर यांनी सर्वात प्रथम या बिग बॉस मराठी ३ च्या स्पर्धकांना पाहिल्यावर कोणती प्रतिक्रिया होती हे सांगितलं.
"बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरु झाल्यानंतर माझ्यासमोर सगळ्यांची नाव आली होती. त्यात मी आदिश वैद्य,गायत्री दातार आणि अन्य काही जणांना ओळखत होतो. परंतु, बाकी काही जणांविषयी फारशी माहिती नव्हती. त्यामुळे हे कोणाला धरुन आणलंय अशी माझी पहिली रिअॅक्शन होती. परंतु, तुमच्या सगळ्यांमध्ये एक वेगळीच क्वालिटी होती आणि ती दिसून आली", असं महेश मांजरेकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "बिग बॉस मराठीच्या प्रवासातील हे तिसरं पर्व मला विशेष आवडलं. प्रत्येकानेच त्यांच्यातील क्वालिटी दाखवली". असं म्हणत महेश मांजरेकरांनी स्पर्धकांचं कौतुकही केलं.
दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरात आता शेवचे ५ स्पर्धक राहिले असून लवकरच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाच्या विजेत्याचं नाव घोषित होणार आहे. त्यामुळे यंदाचं पर्व कोण जिंकतं याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.