आली लग्नघटिका समीप! 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीच्या हातावर सजली मेहंदी, व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:50 IST2025-11-14T18:46:19+5:302025-11-14T18:50:28+5:30
'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, पार पडला मेहंदी सोहळा

आली लग्नघटिका समीप! 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीच्या हातावर सजली मेहंदी, व्हिडीओ आला समोर
Anushka Pimputkar Mehendi Ceremony: सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच कलाकारांनी साखरपुडा करत किंवा आपल्या नात्याची कबुली दिली. प्राजक्ता गायकवाड, शिवानी नाईक अभिनेता निषाद भोईर हे कलाकार लवकर लग्नबंधनात अडकून त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेत्रीच्या घरी सध्या लगीनघाई सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
छोट्या पडद्यावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील प्रत्येक पात्राला घराघरांत पसंती मिळाली. जीवा-नंदिनी, काव्या-यश तसेच मानिनी, वसू आत्या, काव्या आणि नंदिणीची बहिण आरुषी या सगळ्या पात्रांचा घराघरांत एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. यापैकी आरुषीची भूमिका अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने साकारली आहे. आता या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसानंतर अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला. अनुष्काच्या हातावर मेघनच्या नावाची मेहंदी सजली आहे.
अनुष्का 'लक्ष्मी निवास' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता मेघन जाधवसोबत ती येत्या काही दिवसांत लग्नगाठ बांधणार आहे. मेघन आणि अनुष्का गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. येत्या १६ नोव्हेंबरला हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.मेघन सध्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंतची भूमिका साकारत आहे. विकृत माणसाची त्याची ही भूमिका आहे. तर अनुष्का पिंपुटकर 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करत आहे. याआधी ती रंग माझा वेगळा मालिकेत पाहायला मिळाली.