"वाट आता वेगळी आहे...", असं का म्हणतेय शिवानी रांगोळे? पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 13:06 IST2023-10-04T13:05:22+5:302023-10-04T13:06:14+5:30

'चला हवा येऊ द्या' शोमध्ये शिवानीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. शिवानीने या शोमध्ये तिची एक कविता सादर केली. 

marathi actress shivani rangole shared her poetry in chala hawa yeu dya show | "वाट आता वेगळी आहे...", असं का म्हणतेय शिवानी रांगोळे? पाहा व्हिडिओ

"वाट आता वेगळी आहे...", असं का म्हणतेय शिवानी रांगोळे? पाहा व्हिडिओ

कमालीचा अभिनय आणि मेहनतीने अभिनेत्री शिवानी रांगोळेने मराठी कलाविश्वातील ओळख मिळवली. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या शिवानीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बन मस्का' या मालिकेमुळे शिवानीला लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या संपूर्ण टीमने नुकतीच 'चला हवा येऊ द्या'मध्ये हजेरी लावली होती. या मालिकेत सध्या अधिपती आणि अक्षराच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने 'चला हवा येऊ द्या'मध्ये अधिपती-अक्षराच्या लग्नाचा गोंधळ घालण्यात आला. 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये शिवानीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. शिवानीने या शोमध्ये तिची एक कविता सादर केली. 

शिवानी रांगोळेची कविता

वाट आता वेगळी आहे
पावलांना सांगायचे आहे,
नको रमूस त्याच वळणापाशी
उरातली धडधड गिळून टाक...

नजरेला नजर नको पुन्हा
नको तो मनाचा खेळ मनाशी...

चहाच्या वाफेत उडून गेली वेळ
घोट घेत राहिलो शांततेचे,
शेवटी उसासे ठरले बोलके...

घेऊन जाशील सगळे माझे
श्वास तेवढा ठेवून जा,
शब्दांचे ओझे तेवढे कर हलके...

मागे वळून पाहशील मला 
मी धुक्यात विलीन असेन, 
माझ्या मनातही...
मी एकटा असेन.

निरोप देताना उशीर करू नकोस
चुकून पाहशील डोळ्यांत माझ्या
त्या चकव्याला भुलू नकोस...

शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कवितेचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. शिवानीने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' चित्रपटात ती ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती. याबरोबरच शिवानीने 'आम्ही दोघी', 'सांग तू आहेस का' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अँड जरा हटके', 'फुंतरू' या चित्रपटांतही ती झळकली. 

Web Title: marathi actress shivani rangole shared her poetry in chala hawa yeu dya show