मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा; कधी बांधणार लग्नगाठ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:45 IST2025-10-26T13:45:11+5:302025-10-26T13:45:42+5:30
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा आज मोठ्या थाटामाटात साखरपूडा पार पडला आहे.

मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा; कधी बांधणार लग्नगाठ?
गेल्या काही दिवसात अनेक मराठी सेलिब्रिटींनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. काहींचा नुकताच साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्न करणार आहेत. आता मराठी मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील 'अप्पी' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईक हिचा आज मोठ्या थाटामाटात साखरपूडा पार पडला आहे.
शिवानी नाईकच्या खऱ्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची तयारी सुरू झाली आहे. साखरपुड्याच्या या खास दिवसासाठी शिवानीने पारंपरिक वेशभूषा निवडली. तिने लाल रंगाची अतिशय आकर्षक साडी परिधान केली होती. या साडीला असलेल्या गोल्डन (सुवर्ण) रंगाच्या काठाने तिच्या संपूर्ण लूकमध्ये अधिकच भर घातली आहे आणि तिचे सौंदर्य अधिक खुलवले आहे.
शिवानीच्या या पारंपरिक लूकचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे, तिच्या साडीवर परिधान केलेला ब्लाऊज. तिने परिधान केलेल्या ब्लाऊजवर एका सुंदर स्त्रीचे चित्र रेखाटलेले दिसलं. तसेच शिवानीने आपल्या लूकसाठी एक खास 'शेला' निवडला होता. शिवानीने घेतलेला हा शेला मोगऱ्याच्या वेलीचा असल्याने तिच्यावर तो खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अमित रेखी असं शिवानी नाईकच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. अमितने या खास प्रसंगासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. अमित हादेखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. शिवानी नाईकने 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत कलेक्टर अपर्णाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे शिवानीची ही पहिलीच मालिका आहे. मात्र, त्यात तिने तिची भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारली आहे. या मालिकेमुळेच शिवानी अल्पावधीत लोकप्रिय झाली. आता अमित आणि शिवानीच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, शिवानी आणि अमित यांचे अचानक आलेले साखरपुड्याचे फोटो itsmajja कडून शेअर करण्यात आले आहेत.