"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:16 IST2026-01-09T13:12:25+5:302026-01-09T13:16:57+5:30
शशांकला अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. पण, अभिनेत्री माधवी जुवेकरच्या नवऱ्याने शशांकने असं करायला नको होतं, असं म्हटलं आहे.

"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
अभिनेता शशांक केतकर सध्या मंदार देवस्थळी यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत आला आहे. शशांकने त्याच्या सोशल मीडियावरुन व्हिडीओ पोस्ट करत हे मन बावरे मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. वारंवार पैसे मागूनही वेळोवेळी फक्त कारणं दिल्याचं म्हणत शशांकने मंदार देवस्थळींचे मेसेज चॅटही व्हायरल केले आहेत. शशांकला अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. पण, अभिनेत्री माधवी जुवेकरच्या नवऱ्याने शशांकने असं करायला नको होतं, असं म्हटलं आहे.
शशांकसोबत माधवीदेखील हे मन बावरे मालिकेत काम करत होती. मंदार देवस्थळींनी इतर कलाकारांप्रमाणेच माधवीचे पैसे देखील थकवले आहेत. माधवीचे देखील ३.५ लाख रुपये येणं बाकी असल्याचं तिचा पती प्रशांत लोके यांनी म्हटलं आहे. प्रशांत यांनी शशांकच्या पोस्टवर कमेंट केली आहे. "आता मी शशांक केतकर अन् मंदार देवस्थळी यांच्याबद्दल लिहितो. माझी बायको अभिनेत्री माधवी जुवेकर त्या सिरीयलमध्ये होती. मंदार आधी रेग्युलर पेमेंट करायचा. त्या सिरीयलचे अनेक चेक मी स्वत: बँकेत टाकलेत. माझ्या बायकोचे साडेतीन लाख रुपये राहिलेत. पण तिनं कधीही सोशल मीडियावर टाकलं नाही. मंदार स्वत: कर्जबाजारी झाला की,पैसे देऊन कुठे तोंड काळं करून गेला माहीत नाही. पैसे बुडाले की कसा त्रास होतो, हे मला ठाऊक आहे. पण मी सांगतो राकेश सारंग, ज्ञानेश भालेकर आणि विद्याधर पाठारे हे कधीही लोकांचे पैसे न बुडवणारे निर्माते माझ्या नशिबात आले. हे निर्माते स्वत:चे घर, ऑफिस विकतील पण लोकांचे पैसे देतील", असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणतात, "रेग्युलर चेक देणाऱ्या मंदारचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. (किंवा नसेलही) पण शशांकने एवढा तमाशा करायला नको होता. माझे पण केदार शिंदेने पैसे बुडवले आहेत. पण काही पुरावे नसल्यामुळे मी त्याबद्दल कुणालाही बोलत नाही. माधवी जुवेकर बीएसटीतील सुट्ट्यांचं गणित सांभाळून मालिका करत होती. पण ती माझ्यासारखी वाह्यात नसल्यामुळे तिने फेसबुकवर काही टाकलं नाही. मला मान्य आहे की सगळेच प्रोड्युसर राकेश सारंगसारखे ग्रेट नसतात. मी मंदारचं समर्थन करत नाहीये. पण थांबवा तो विषय. माधवीला पण त्या कष्टाच्या पैशाची आठवण येते. पण नाही तिच्या नशिबात ती पुढच्या कामाला लागली आहे".