एकाच दिवशी दोनदा अपघात झाला; मृत्यूच्या दाढेतून परतलेली अभिनेत्री, सांगितला जीवघेणा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:11 IST2026-03-10T13:08:56+5:302026-03-10T13:11:06+5:30
"माझा पाय काळा-निळा पडला होता,अन्...", 'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीने सांगितला अपघाताचा भयानक प्रसंग

एकाच दिवशी दोनदा अपघात झाला; मृत्यूच्या दाढेतून परतलेली अभिनेत्री, सांगितला जीवघेणा प्रसंग
Marathi Actress Nandini Vaidya: नंदिनी वैद्य हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव आहे. त्यांनी आजवर अनेक गाजलेली नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'भाग्य दिले तू मला', 'कोण होतीस तू, काय झालीस तू' यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. पण,नंदिनी वैद्य यांच्यावर एक वेळ अशी आलेली, जेव्हा त्यांनी नाटकात काम करणं बंद केलं. नंदिनी वैद्य यांचा मोठा अपघात झालेला. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वर्षा यांनी अपघाताचा प्रसंग सांगितला आहे.
नंदिनी वैद्य यांनी नुकतीच 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान नंदिनी यांना त्यांच्या अपघाताबद्दल विचारण्यात आलं.दरम्यान, त्या म्हणाल्या,"त्यावेळी
आम्ही गोव्यावरून येत होतो आणि मुंबईला निघालो असतानाच आमचा अपघात झाला. रात्रभर प्रवास केल्याने आम्ही नाश्ता करण्यासाठी बसमधून खाली उतरलो. नाश्ता करून बसमध्ये बसलो होता. साधारण १० ची ती वेळ होती. पण, तेव्हा एका क्षणात काय झालं कळलंच नाही. ती बस पूर्णपणे फिरली आणि पलटली.मग कळलं की काहीतरी विचित्र आपल्यासोबत घडलंय."
मग अभिनेत्री म्हणाली,"मला पायाला लागलं होतं आणि पाय पूर्ण काळा-निळा पडला होता. त्यानंतर तासाभरानंतर डॉक्टर आले.जवळपास ६ ते ७ माणसं अशी होती ज्यांना खूप लागलं होतं. बाकीचे जे व्यवस्थित होते ते तिथून निघून गेले. पण, आम्हाला काही काळ त्या दवाखान्यात ठेवलं गेलं. सगळीकडे रडारड, प्रचंड वेदना कोणालाही व्यवस्थित ट्रिटमेन्ट मिळत नव्हती. अशी सगळी परिस्थिती होती."
त्या घटनेचा मी धसका घेतला…
त्यानंतर नंदिनी वैद्य म्हणाल्या," मग आम्हाला दुपारी एकच्या सुमारास गावातील एका टेम्पोमध्ये बसवलं आणि मुंबईला पाठवलं. दिवस कसा गेला कळलं नाही. तेव्हा प्रचंड पाऊस सुरु होता आणि गाडी रात्र झाल्यानंतर घाटात होती. त्यावेळी तो ड्रायव्हर खूप जोरात गाडी नेत होता.आम्ही त्याला सांगितलं,आम्हाला आधीच दुखापत झाली आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालव. हा माझा एरिया आहे.तुम्हाला काही होणार नाही असं तो म्हणू लागला. त्यानंतर घाट संपला आणि त्याने एका गाडीला धडक दिली. तिथे मी सीटवर झोपले असताना टेम्पोमध्ये खाली पडले. माझ्या गाळाला लागलं त्यातून रक्त येऊ लागलं. इतकंच नाहीतर तो माणूस तिथून पळून गेला. त्यावेळी अक्षरश: आम्ही फुटपाथवर बसलो होतो. मग रस्त्यावरील गाड्यांना हात करून कसेबसे मुंबईत पोहोचलो. त्या घटनेचा मी धसका घेतला.त्यामुळे मला नाटकात काम करण्याची भीती वाटू लागली. कारण, दौऱ्यांसाठी बसने प्रवास करायला लागायचा. आणि त्या प्रवासाला मी घाबरू लागले होते."असा खुलासा अभिनेत्रीने केला.