बायोलॉजी शिकवताना आयुष्याची केमिस्ट्री जुळली! 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजीची 'फिल्मी' लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:27 IST2026-01-10T16:57:42+5:302026-01-10T17:27:25+5:30
'कमळी' मधील अन्नपूर्णा आजीची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी

बायोलॉजी शिकवताना आयुष्याची केमिस्ट्री जुळली! 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजीची 'फिल्मी' लव्हस्टोरी
Kamali Serial Actress Ila Bhate Lovestory: छोट्या पडद्यावरील कमळी ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे.या मालिकांच्या कथा, पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गावाकडून शहराकडे आलेली साधीभोळी कमळी प्रेक्षकांना भावली आहे. मालिकेत कमळीची भूमिका अभिनेत्री विजया बाबरने साकारली आहे. तर अभिनेत्री इला भाटे मालिकेत अन्नपूर्णा नावाची व्यक्तिरेखा साकारत आहेत.त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सध्या इला भाटे एका मुलाखतीमुळे चर्चेत आल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी आपल्या लग्नाचा किस्सा शेअर केला आहे.
अभिनेत्री इला भाटे या गेली अनेक वर्षे मराठी कलाविश्वात सक्रिय आहेत.खरंतर, त्यांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं, परंतु, कमी गुण मिळाल्याने त्यांनी डिएमएलटी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईत त्यांनी स्वतःची लॅब चालू केली. अभिनेत्री इला भाटे यांचे पती उदय भाटे हे पेशाने डॉक्टर आहेत. आपल्या मित्राची बहीण म्हणून इला यांना ते बायोलॉजी शिकवायला घरी येत होते, आणि त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. कमी वय असल्यामुळे सुरुवातीला या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध दर्शवला होता. मात्र, कालांतराने सगळे राजी झाले. नुकत्याच दुरदर्शन सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत इला भाटे आणि त्यांचे पती उदय भाटे यांनी हजेरी लावली. यादरम्यान, त्यांनी आपली प्रेमकहाणीविषयी सांगितलं.
याबाबत बोलताना इला म्हणाल्या,"माझ्या व उदयच्या मनातल्या भावना, आम्ही बोलून दाखवल्या नसलो तरी दोन्ही घरच्या मंडळींनी त्या ओळखल्या होत्या.मग इला यांचे पती म्हणाले, 'सुरुवातीला मी हाफ पॅन्ट घालायचो पण हिला ते आवडायचं नाही. मग हिला खालून येताना पाहिलं की पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून धावत घरात जात माझी धाकटी बहीण त्याला सांगायची 'दादा, इला आली' मग पटकन् हाफ पॅन्ट बदलून फुल पॅन्ट घालायचो. " यालाच जोडून इला भाटे म्हणाल्या,"लग्नानंतर मात्र घरातच नाही तर पार्ला मार्केटमध्ये जातानाही तो बिनधास्त हाफ पँट घालू लागला." अशी फिल्मी लव्हस्टोरी त्यांनी शेअर केली.