"गरोदरपणात माझं वजन ५० वरुन ८९ किलो झालं होतं, त्यामुळे..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:12 IST2025-06-17T17:11:43+5:302025-06-17T17:12:58+5:30
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री दिपाली पानसरेने प्रेग्नंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याचा खुलासा केला आहे.

"गरोदरपणात माझं वजन ५० वरुन ८९ किलो झालं होतं, त्यामुळे..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव
गरोदरपणानंतर मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींना वाढलेल्या वजनाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकदा अभिनेत्रींना नैराश्यही येतं. 'आई कुठे काय करते' मधील अशाच लोकप्रिय अभिनेत्रीला प्रेग्नंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे डिप्रेशनचा सामना करावा लागला. ही अभिनेत्री आहे दिपाली पानसरे. 'आई कुठे काय करते' मालिकेत रुपाली भोसलेच्या आधी दिपाली पानसरे संजनाची भूमिका साकारायची. दिपालीने प्रेग्नंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे तिला किती त्रास झाला, याचा खुलासा केला आहे.
प्रेग्नंसीनंतर वाढलेलं वजन आणि झालेला त्रास
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिपाली म्हणाली, "प्रेग्नंसीच्या काळात माझं वजन ५० वरुन ८९ किलो झालं होतं. मग ८९ किलो वरुन मी सहा महिन्यात ७८ किलोवर आले होते. यावेळी मला कळत नव्हतं, आपल्या मनाकडे खूप शक्ती आहे. तुम्ही जसं विचार कराल, जसं स्वतःला बघाल, तसंच होईल. मी तेव्हा स्वतःला सांगितलं असतं, की ठीक आहे. तू एका जीवाला जन्म दिलायस, तर तुझं जग आणि शरीर बदलणार आहे, आणि ते नॉर्मल होईल, ते मी स्वतःला नाही सांगितलं त्यामुळे मी पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये गेले."
"परंतु आता मला माहितीये की, माझं वजन वाढलेलं आहे. चार लोक मला म्हणतात की वजन वाढलेलं आहे. मग हे कसं कमी करायचं, त्याची इच्छाशक्ती माझ्यात आली आहे. एक वय असतं, आणि त्या वयानंतर तुमचे हार्मोन वगैरे बदलतात. आता मी ठरवलं तर चार महिन्यात बारीक होईल. पण ते ठरवत नाहीये." (असं दिपाली हसत म्हणाली)
"रुआन झाल्यावर मला पहिली जाहिरात मिळाली तेव्हा मी ७८ किलोची होते. मी ऑडिशनच पाठवत नव्हते. यात कुटुंबाचा सहभाग असणं खूप महत्वाचं आहे. सर्व चांगलं असताना तुम्हाला अचानक रडू का येतंय, यावेळी तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असणं गरजेचा असतो. पण यातून मी बाहेर पडले." अशाप्रकारे दिपालीने अनुभव सांगितला आहे. दिपाली आपल्याला अलीकडेच नुकत्याच रिलीज झालेल्या 'झापुक झुपुक' सिनेमात बघायला मिळाली.