"पैसे नव्हते, बांगड्या गहाण ठेवल्या अन्...",मराठी अभिनेत्रीने सांगितला निर्मिती क्षेत्रातील वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:43 IST2025-10-10T15:25:51+5:302025-10-10T15:43:18+5:30
"प्रोड्युसर पैसे पाठवत नव्हता, त्यामुळे...", मराठी अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीतील अनुभव, काय घडलेलं?

"पैसे नव्हते, बांगड्या गहाण ठेवल्या अन्...",मराठी अभिनेत्रीने सांगितला निर्मिती क्षेत्रातील वाईट अनुभव
Aditi Deshpande: अभिनेत्री अदिती देशपांडे हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. त्यांनी आजवर अनेक मराठी,हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दशक्रिया, वजनदार, जोगवा, तसेच पक पक पकाक अशा गाजलेल्या चित्रपटांमधून लक्षवेधी भूमिका त्यांनी साकारल्या. अदिती देशपांडे या दिग्गज अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या सूनबाई आहेत. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत अदिती यांनी 'जीजी आक्का' नावाची व्यक्तिरेखा साकारून चाहत्यांची मनावर अधिराज्य गाजवलं. पण, अभिनयासह कारकिर्द चांगली सुरु असताना त्या निर्मिती क्षेत्राकडे वळल्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी निर्मिती क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अदिती देशपांडे यांना निर्मिती क्षेत्रात काम करताना आलेल्या आव्हानांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. त्या संघर्षकाळाविषयी बोलताना त्या म्हणााल्या, "हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. 'पाऊस येता येता' मालिकेची एक गोष्ट आहे. आम्हाला त्या प्रोड्यूसरने काही पैसे दिले आणि आम्ही कोल्हापुरला शूट करत होतो. या मालिकेत सुलभा देशपांडे, जोत्स्ना कार्येकर तसंच मी स्वत: देखील होते. त्याचदरम्यान, मला श्रावणसरीचं प्रोड्यूसर म्हणून काम मिळालं. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट साईन करायला मला मुंबईला यायचं होतं आणि असं झालं की आमच्याकडे पैसेच उरले नव्हते. तो प्रोड्यूसर पैसे पाठवत नव्हता. त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न माझ्यासमोर होता. शिवाय त्या संपूर्ण टीमला दोन दिवस जेवण वगैरे यासाठी पैसे लागणार होते. तसंच त्यांना परत आणण्याची जबाबादारी देखील आमच्यावर होती."
हातातील बांगड्या गहाण ठेवल्या, कारण...
तो किस्सा सांगताना त्या पुढे म्हणाल्या, "त्यानंतर मी घरी आले. तेव्हा माझ्या हातातील बांगड्या मी गहाण ठेवल्या. त्यातले पैसे घेतले सगळ्या लोकांना मी कोल्हापुरात परत आणलं. त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त एक गोष्ट होती की, ही कलाकार मंडळी माझी जबाबदारी आहे. माझ्या एका शब्दाखातर ते मुंबईत आले होते. त्यांना तो प्रोड्यूसर कोण आहे याबद्दल काहीच माहित नव्हतं. ही गोष्ट मी त्यावेळी कोणालाच सांगितली नाही. मग मी हळूहळू काम करत राहिले, पैसे साठवले आणि मग त्या बांगड्या सोडवल्या. त्यानंतर मी घरच्यांना सगळं काही सांगितलं."