'हा' मराठी अभिनेता नगरपालिका निवडणूक लढवणार? सोशल मीडियावरुन दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:18 IST2025-11-06T12:15:17+5:302025-11-06T12:18:30+5:30
मूळ वाईचा हा अभिनेता वाईकरांना साद घालत आहे.

'हा' मराठी अभिनेता नगरपालिका निवडणूक लढवणार? सोशल मीडियावरुन दिली हिंट
महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. २ डिसेंबरला मतदान आणि ३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान एक मराठी अभिनेताही निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याची चर्चा आहे. मूळ वाईचा हा अभिनेता वाईकरांना साद घालत आहे.
'लागिरं झालं जी'फेम अभिनेता तेजपाल वाघ नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. वाईकरांसाठी तेजपालने पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो, "आजवर मला वाईने, वाईकरांनी भरपूर प्रेम दिलं.. आता आपल्या वाईसाठी काहीतरी करायची वेळ आली आहे. वाई शहरात अनेक समस्या आहेत ज्या सामान्य वाईकर नागरिकाला रोज भेडसावत आहेत. त्या सोडवण्यासाठी आपल्यालाच वाई नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. हा आपला वाईकर नागरिकांचा लढा आहे आणि तो आपण एकत्र मिळून लढूया..! ही लढाई कोणत्याही राजकीय नेतृत्वाच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तर ही आपल्या प्रश्नांच्या, अडचणींच्या विरोधात आहे.
हा लढा आपण एकत्र मिळून लढूया आणि आपल्या वाईला घडवूया..!!
आपलाच -
तेजपाल जयंत वाघ."
तेजपालने इन्स्टाग्रामवर निवडणूकीसाठी काही स्लोगनही बनवलेले दिसत आहेत. मी नाही, आपण लढूया...आपल्या वाईला आपण घडवूया...! असा नारा दिला आहे. तसंच वाईतील समस्याही मांडल्या आहेत. यावरुन तो नक्कीच निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याची चर्चा आहे.
तेजपाल वाघ 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'मधून प्रसिद्ध झाला. 'लागिरं झालं जी' लोकप्रिय मालिकेतून त्याला घराघरात ओळख मिळाली. नंतर तेजपालने लेखनाकडे मोर्चा वळववा. त्याने सहकुटुंब सहपरिवार','कारभारी लईभारी' या मालिकांचं लेखन केलं. सध्या तो लिहीत असलेली 'इन्स्पेक्टर मंजू' ही मालिका जोरात सुरु आहे.