'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेता विवेक सांगळेचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद पडलं, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:21 IST2026-03-10T13:20:39+5:302026-03-10T13:21:09+5:30
खूप वाईट वाटतंय, इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरलं..., विवेक सांगळेने सांगितलं नक्की काय घडलं?

'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेता विवेक सांगळेचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद पडलं, म्हणाला...
स्टार प्रवाहवरील'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. मालिकेतील 'काव्यार्थ' आणि 'जीवानंदिनी' या दोन जोड्या हिट झाल्या आहेत. जीवाच्या भूमिकेत अभिनेता सागर सांगळे आणि नंदिनीच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल दुसानिस आहे. तर काव्याच्या भूमिकेत ज्ञानदा रामतीर्थकर आणि पार्थच्या भूमिकेत विजय आंदळकर आहे. नुकताच मालिकेत त्यांच्या लग्नाचा सीक्वेन्स झाला. लग्नाआधीचं त्यांचं फोटोशूट, लालबागला काढलेली वरात सगळंच गाजलं. या सगळ्या अभिनेता विवेक सांगळे इन्स्टाग्रामवरुन मात्र गायब दिसला. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून विवेकचं इन्स्टाग्राम अकाऊंटच बंद झाल्याचा खुलासा त्याने केला आहे. नक्की काय झालं?
विवेक सांगळेने नवीन इन्स्टाग्राम अकाऊंट उघडलं असून त्यावरुन व्हिडीओ शेअर करत तो म्हणाला, "नमस्कार मित्रांनो, मी विवेक सांगळे. गेल्या दोन महिन्यांपासून माझे अनेक मित्र मला विचारत आहेत की अरे कुठे आहेस? तुझं इन्स्टाग्रामवरचं अकाऊंट दिसत नाहीये. काय झालं? तर मला सगळ्यांनाच सांगायचंय की ३ जानेवारीला इन्स्टाग्रामने मला कोणतीही पूर्वकल्पना न देता माझं अकाऊंट डिलिट केलंय. ते अकाऊंट परत मिळवण्यासाठी या दोन महिन्यात मी खूप प्रयत्न केले. मी बीकेसीच्या मेटा टीमसोबत बोललो, इन्स्टाग्रामच्या कस्टमर केअरसोबत बोललो. जी मेटाची युएसमध्ये टीम आहे त्यांना बरेच मेल केले. पण त्यांनी एकाही मेलला रिप्लाय केला नाही. जे अकाऊंट तुम्ही स्वत: व्हेरिफाय केलंय त्या व्यक्तीला पूर्वकल्पना न देता थेट तुम्ही अकाऊंट सस्पेंड करता. इतक्या वर्षांची मेहनत असते त्यावर एका दिवसात पाणी फेरलं गेलं. मला खूप वाईट वाटलं. गेले दोन महिने मी मनापासून प्रयत्न केले पण काहीच घडलं नाही."
"असो, आयुष्य पुन्हा उभं राहण्याची एक संधी देत असतं आणि मी ती संधी घेण्याचं ठरवलं आहे. मी नव्याने उभं राहण्याचं ठरवलंय. मी नवीन इन्स्टाग्राम अकाऊंट ओपन करतोय आणि मला खात्री आहे यावेळीही तुम्ही भक्कम पाठिंबा द्याल. धन्यवाद."
विवेक सांगळेचे इन्स्टाग्रामवर १ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्याच्या रील्स, व्हिडीओला कोटींमध्ये व्ह्यूज असायचे. मात्र आता त्याला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली आहे. विवेक सांगळे याआधी 'भाग्य तू दिले मला','आई माझी काळूबाई' मालिकेत दिसला होता.