'लग्नानंतर होईलच फेम' अभिनेत्याने लालबागमध्ये घेतलं आलिशान घर, गृहप्रवेशाचा व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:06 IST2025-08-06T18:05:14+5:302025-08-06T18:06:10+5:30
मुंबईतील गिरणगावातच लहानाचा मोठा झाला अभिनेता, आज तिथेच घेतलं नवं घर

'लग्नानंतर होईलच फेम' अभिनेत्याने लालबागमध्ये घेतलं आलिशान घर, गृहप्रवेशाचा व्हिडिओ समोर
मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षात मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. तर काहींनी मुंबईबाहेरही घरं घेतली आहेत. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेता विवेक सांगळेचंही (Vivek Sangle) घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. गिरणगावचा परिसर अशी पूर्वी ओळख असलेल्या लालबागमध्ये त्याने आलिशान घर घेतलं आहे. आजच त्याने नवीन घरात प्रवेश केला. गृहप्रवेश आणि पूजा करतानाचा त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
अभिनेता विवेक सांगळेने नवीन घरात प्रवेश केला आहे. वास्तुशांतीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. तसंच यामध्ये विवेकच्या आलिशान घराची झलकही दिसत आहे. हॉलमधील बाल्कनीतून मुंबईचा नजारा खूपच सुंदर दिसतोय. विवेक मुंबईचाच आहे. गिरणगावातच त्याचं बालपण गेलं आहे. त्याच्याच परिसरात त्याने आता स्वत:चं आलिशान घर घेतलं. त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मात्र मेहनत आणि जिद्दीने त्याने आपलं हे स्वप्न पूर्ण करुन दाखवलं आहे.
विवेक सांगळेने २००९-१० साली अभिनय क्षेत्रात आला. त्याने 'आई माझी काळूबाई','लव्ह लग्न लोचा','भाग्य दिले तू मला' या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'भाग्य दिले तू मला'मध्ये त्याची आणि तन्वी मुंडलेची जोडी गाजली. तर आता तो 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.