विशाल निकमचं सेटवर वर्कआऊट, उपलब्ध वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 16:41 IST2021-01-18T16:34:09+5:302021-01-18T16:41:07+5:30
'दख्खनचा राजा' या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवले.

विशाल निकमचं सेटवर वर्कआऊट, उपलब्ध वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहेत. ही मालिका महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती आहे.या मालिकेचे शूटिंग कोल्हापुरात सुरू असून त्यासाठी चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभा केला आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे.
या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवले. विशाल हा स्वत: जिम ट्रेनर असून नुकताच अभिनयाकडे वळला आहे. विशालने याआधी ‘साता जन्माच्या गाठी’या मालिकेत तर 'मिथुन्' आणि 'धुमस' या सिनेमात भूमिका साकारल्या होत्या.
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल त्याच्या भूमिकेसाठी खूपच मेहनत घेतोय. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून तो वर्कआऊट करतो.
खंरतर शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नसल्यामुळे विशालने सेटवरच वर्कआऊट करणं सुरु केलं आहे. भूमिकेसाठी फिटनेस राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच विशालने हा नवा मार्ग शोधून काढला आहे.
सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्याने सेटलाच जीम बनवलं आहे. विशाल शाकाहरी आहे. त्यामुळे दूध, मोड आलेली कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं अश्या सकस आहाराकडे त्याचा कल असतो. सोबतीला दररोजचा व्यायाम असल्यामुळे विशालला फिटनेस राखणं शक्य झालं आहे.
फिटनेस प्रेमाविषयी सांगताना विशाल म्हणाला, ‘मी ज्योतिबाच्या भूमिकेसाठी बारा किलो वजन वाढवलं होतं. मात्र शूटिंगच्या वेळापत्रकातून हे वजन तसंच राखणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे.
दररोज जीमला जाणं शक्य नसल्यामुळे मी सेटवरच वर्कआऊट करतो. सेटवर लाईट्ससाठी वापरले जाणारे वेट्स आणि काही उपलब्ध गोष्टींचा वापर करुन मी वर्कआऊट करतो.
डाएटिशनच्या सल्यानेच मी माझा आहार घेतो. सेटवर माझ्या खाण्यापिण्याचीही योग्य काळजी राखली जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच मला माझा फिटनेस राखणं शक्य होत आहे. प्रेक्षकांचा देखिल दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेला भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.