"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 09:01 IST2025-05-26T08:58:21+5:302025-05-26T09:01:07+5:30
मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राचीला दिग्गज मराठी अभिनेता सुदेश म्हशिळकर यांनी आक्षेपार्ह मेसेज केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत संपूर्ण प्रकार सांगितला आहे.

"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राचीला दिग्गज मराठी अभिनेता सुदेश म्हशिळकर यांनी आक्षेपार्ह मेसेज केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत संपूर्ण प्रकार सांगितला आहे. सुदेश म्हशिळकर प्राचीला वारंवार मेसेज करून तिला त्रास देत असल्याचं उघडकीस आलं आहे. अभिनेत्रीने सुदेश यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत त्यांची मानसिकता दाखवून दिली आहे.
प्राचीला सुदेश यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक अशा दोन्ही ठिकाणी मेसेज केला आहे. मेसेज करत त्यांनी अभिनेत्रीकडे थेट तिच्या नंबरची मागणी केली आहे. एवढंच नव्हे तर फ्लर्ट करायची इच्छा झाल्याचंही त्यांनी मेसेजमध्ये म्हटलं आहे. प्राचीने शेअर केलेल्या पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये सुदेश म्हशिळकर यांनी अभिनेत्रीला "तुझा नंबर पाठव...तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये...कसली गोड दिसतेस", असा मेसेज केला आहे. तर दुसऱ्या मेसेजमध्ये "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह", असं सुदेश यांनी म्हटलं आहे.
हे स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने सुदेश यांना चोख उत्तर दिलं आहे. "...आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असेलच...ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का...मला धमकावून, प्रेशर आणून पोस्ट डिलीट करायला सांगून गप्प राहायला सांगितलं. त्यामुळेच मला वाटतं की ही पोस्ट आता माझ्या इन्स्टाग्राम फीडमध्ये असावी, अशी आता माझी इच्छा झालीये. चला विषय संपवुया...जोपर्यंत सुदेश म्हशिळकर गोड अपोलोजी पोस्ट करत नाही. तेदेखील माझ्या नंबर वर वाही तर फेसबुकवर...माफी मागायची इच्छा नसेल आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते", असं तिने म्हटलं आहे.
प्राचीच्या या पोस्टवर सगळ्यांनीच संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्राचीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सुदेश सध्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत काम करत आहेत. प्राचीने केलेल्या या आरोपांवर अद्याप सुदेश यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.