"माझ्यातला रोमियो वाहून गेला, गावच्या नदी पात्राला आलेल्या भयंकर पुरात...", श्रेयस राजेने मांडलं धगधगतं वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:27 IST2025-09-25T13:21:01+5:302025-09-25T13:27:01+5:30
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचं भीषण वास्तव अभिनेता श्रेयस राजे याने त्याच्या कवितेतून मांडलं आहे.

"माझ्यातला रोमियो वाहून गेला, गावच्या नदी पात्राला आलेल्या भयंकर पुरात...", श्रेयस राजेने मांडलं धगधगतं वास्तव
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नद्यांना पूर आल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. अजुनही अनेक गावांना पुराचा वेढा असून घरांसह पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक संसार रस्त्यावर आले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक भागांतून मराठवाड्यातील या गावांना मदत केली जात आहे. तर काही कलाकारही पुढे आले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचं भीषण वास्तव अभिनेता श्रेयस राजे याने त्याच्या कवितेतून मांडलं आहे.
प्रिये...
तुझ्या रेखीव तपकिरी डोळ्यांचं वर्णन करणारी कविता लिहायला माझ्याकडे शब्द नाहीत असं नाही. पण, माझ्यातला रोमियो वाहून गेला गावच्या नदी पात्राला आलेल्या भयंकर पुरात...
तुझ्या लटा-बटांच्या सौंदर्याची शब्दचित्र रेखाटणं कितीही भुलवणारं वाटत असलं तरी मला दिसत राहते प्रतिमा उद्ध्वस्त झालेल्या पिकात उभं राहून टाहो फोडणाऱ्या सखाराम, बारकू किंवा भीमाबाईची...
दप्तर वाहून गेल्याची हकीकत सांगणाऱ्या सोनालीच्या डोळ्यात पाहताना मी कशी करू गं तुझ्या स्तुतीसाठी अलंकारिक शब्दांची जुळवाजुळव?
तुझ्या मिठीतल्या उबेत सुरक्षित यमक जुळवणं कठीण नाही मला, पण मला उघड्यावर पडलेले संसार दिसतात त्याचं काय करू?
मी पाहीनही स्वप्न आपल्या गोड गुलाबी नात्याची, पण त्या स्वप्नात अचानक परिस्थिती उद्विग्न होऊन फास लावून घेतलेला कुणी शेतकरी दिसला तर?
मला खूप आवडलं असतं फुलपाखरं उडवत एखादी प्रेमकविता लिहायला. पण मी वही पेन हातात घेतो तेव्हा पीळ पडलेली पोटं घेऊन भकास नजरेने माझेच काही बांधव माझ्याकडे आशेने बघत असतात... काय करू?
श्रेयस राजेने त्याच्या सोशल मीडियावरुन ही पोस्ट शेअर केली असून त्याला चाहत्यांकडूनही दाद मिळत आहे. श्रेयस कायमच त्याच्या पोस्टमधून समाजातील विविध घडामोडींवर भाष्य करत असतो.