"वेळेवर नाश्ता नाही, जेवण नाही...", 'सिंधुताई सपकाळ' मालिकेच्या सेटवर कलाकारांचे झाले हाल, अभिनेत्याने सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 10:58 IST2025-10-05T10:58:16+5:302025-10-05T10:58:53+5:30
मालिका किंवा सिनेमा प्रदर्शित होऊनही अनेकदा कलाकारांचे पैसे दिले जात नाहीत. 'सिंधुताई माझी माय' या मालिकेत काम केलेल्या कलाकारांनाही असाच काहीसा अनुभव आला आहे. अभिनेता शंतनु गांगणेने याबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला.

"वेळेवर नाश्ता नाही, जेवण नाही...", 'सिंधुताई सपकाळ' मालिकेच्या सेटवर कलाकारांचे झाले हाल, अभिनेत्याने सगळंच सांगितलं
सिनेइंडस्ट्रीतून सतत काम करुनही पैसे न मिळाल्याची तक्रार कलाकार करताना दिसतात. अशी अनेक प्रकरणं कलाकारांनी समोर आणलेली आहेत. मालिका किंवा सिनेमा प्रदर्शित होऊनही अनेकदा कलाकारांचे पैसे दिले जात नाहीत. 'सिंधुताई माझी माय' या मालिकेत काम केलेल्या कलाकारांनाही असाच काहीसा अनुभव आला आहे. अभिनेता शंतनु गांगणेने याबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. या मुलाखतीत अभिनेत्याने निर्मात्यांची पोलखोल केली आहे.
शंतनु गांगणे म्हणाला, "एक मालिका आली जी कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर होती. त्या मालिकेत जी मंडळी काम करत होती त्यांची एका मोमेंटला अशी भावना झाली की सिंधुताईंनी आयुष्यभर ज्याप्रकारे त्रास सहन केला, हालअपेष्टा सहन केल्या. तेवढ्याच हालअपेष्टा आपल्याला पण ही मालिका करताना येत्यात. कारण, वेळेवर नाश्ता न मिळणं, जेवण न मिळणं, कमी पडणं..राहण्याची, बसण्याची, उठण्याची गैरसोय असणं आणि पैसे तर खूप उशीरा देणं होतंच. नंतर अनेकांचे पैसे दिले गेले नाहीत. मला जेव्हा ही गोष्ट कळले तेव्हा काय म्हणता येईल...एका कार्यक्रमासाठी सिंधुताई तुळजापूरमध्ये आल्या होत्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातले खूप सारे प्रसंग सगळ्यांसमोर सांगितले. ते सगळे प्रसंग सांगून झाल्यानंतर शेवटी माईंनी पदर पसरून त्यांनी ज्या लोकांसाठी, अनाथांसाठी आयुष्यभर झटल्या. त्यांना मदत करावी म्हणून त्या माऊलीने लोकांकडे मदत मागितली. की माझ्याकडे खूप सारे लोक आहेत ज्यांचं पोट मला भरायचं आहे. ज्यांना कोणीच नाहीये. ती माझी लेकरं माझी वाट बघत्यात. मला असं वाटतं की मला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे".
"अशा व्यक्तीच्या जीवनावर एखादी मालिका येते आणि त्या लोकांबरोबर काम करताना त्या लोकांचे पैसे दिले जात नाहीत. हा त्या माऊलीचा अनादर, अपमान नाहीये का? म्हणजे निर्मात्यांना त्या वाहिनीला असं कधीच वाटलं नाही का की आपण त्या माऊलीच्या स्मृतींना अनादर करतोय? लोक फोन करून करून परेशान होतात आणि त्यांचे पैसे दिले जात नाहीत. अशा अनेक मालिका आहेत. साधूसंतांबद्दल असलेल्या मालिका सगळ्यांनी नैतिक जबाबदारी पाळायला पाहिजे की फक्त फायद्यासाठी म्हणून कोणाच्यातरी जीवनावर, श्रद्धेवर हा जो व्यवसाय मांडलाय तो थांबायला पाहिजे. याची नैतिक जबाबदारी घ्यायला हवी. आणि जी मंडळी या लोकांचे आदर करतात, त्यांचे अनुयायी आहेत. त्यांनी खरं तर अशा गोष्टींचा जाब विचारायला हवा. तुम्ही माझ्या माऊलीच्या नावावर मालिका केली. तिच्या नावावर पैसे कमावण्याचा प्रयत्न केला आणि अनेक लोकांचे तुम्ही पैसे बुडवले. ते लोक हालअपेष्टा सहन करत आहेत असं करून तिच्या आत्मासाठी हा क्लेशदायक प्रकार आहे", असंही पुढे अभिनेत्याने सांगितलं.