"बाबाच्या छातीत दुखत होतं अन्...", मिलिंद गवळींची लेक मिथिलाने सांगितला 'तो' भावुक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:03 IST2025-09-28T14:56:27+5:302025-09-28T15:03:07+5:30
मिलिंद गवळींची लेक मिथिलाने सांगितला 'तो' भावुक प्रसंग, म्हणाली...

"बाबाच्या छातीत दुखत होतं अन्...", मिलिंद गवळींची लेक मिथिलाने सांगितला 'तो' भावुक प्रसंग
Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी हे नाव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत गणलं जातं. आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेमध्ये त्यांनी साकारलेला अनिरुद्ध प्रचंड गाजला. सध्या ते हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहेत. मिलींद गवळी या सोशल मीडियावरही हल्ली बरेच सक्रिय झाले आहेत. आपल्या पत्नी, कुटुंबियांबरोबरचे खास क्षण ते शेअर करत असतात. त्यांना एक मुलगी देखील आहे तिचं नाव मिथिला आहे. दरम्यान, मिथिला अभिनय क्षेत्रात सक्रिय नसून फिटनेस ट्रेनर अशी तिची ओळख आहे.
नुकतीच मिलिंद गवळी आणि त्यांची लेक मिथिलाने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अशातच या मुलाखतीमध्ये मिथिलाने वडिलांच्या बाबतीत घडलेला एक भावुक प्रसंग शेअर केला. त्याविषयी बोलताना मिथिला म्हणाली, "अजूनही आणि आतापर्यंत बाबा पूर्णपणे फिजिकल हेल्थकडे लक्ष देतोय. सात्विक जेवण वगैरे याकडे तो कटाक्षाने लक्ष देतो.पण, माझा फिटनेस ट्रेंनिंग चालू करण्याचा उद्देश हाच आहे की, माणसाने तणावावर मात कशी करावी हेच आपल्याला शिकवण्यात आलेलं नाही. एक मुलगा तसेच एक बाप म्हणून प्रत्येकावर जबाबदारी असते. आपल्यामुळे समोरच्या माणसाला त्रास होऊ नये, म्हणून बऱ्याचदा लोक व्यक्त होत नाही. बाबाच्या बाबतीतही असंच आहे."
'तो' किस्सा सांगत मिथिला म्हणाली...
त्यानंतर मिथिला म्हणाली, "एकदा आम्ही रात्री जेवण करुन सगळे घरी येत होतो. आजी-आजोबा, मी आणि आई सगळे एकत्र होतो आणि आमची लिफ्ट बंद झाली. साधारण सहाव्या की सातव्या मजल्यावर ती लिफ्ट अडकली. त्यावेळी बाबांना थोडा छातीत
त्रास होत होता तरीही तो पळत वर गेला आणि लिफ्ट खाली घेऊन आला. त्यामुळे त्याचा त्रास वाढला. घरात आल्यानंतर थोडावेळ बाबा बेडवर पडलेला मी पाहिला. मला वाटलं दम वगैरे लागला असेल तर मी त्याला विचारलं. त्यानंतर लगेचच तो बेडवरुन उठला आणि काहीच झालं नाही असं वागू लागला. त्याच्या दोन दिवसानंतर तो स्वत: हॉस्पिटलमध्ये जाऊन अॅडमिट झाला. अगदी सगळी ट्रिटमेंन्ट झाल्यानंतर त्याने मग आम्हाला सांगितलं. " असा भावुक किस्सा तिने शेअर केला.