"पुस्तकं, वह्या, दप्तर अन्...", कुशल बद्रिके रमला शाळेच्या आठवणीत, म्हणाला-"माझ्या दोन्ही मुलांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:52 IST2025-06-17T13:39:26+5:302025-06-17T13:52:48+5:30

"शाळेच्या खिडकीपासून सुरु झालेला प्रवास ट्रेनमधील खिडकीपर्यंत...", कुशल बद्रिकेच्या पोस्टची चर्चा

marathi actor kushal badrike remembering school days shared post on social media | "पुस्तकं, वह्या, दप्तर अन्...", कुशल बद्रिके रमला शाळेच्या आठवणीत, म्हणाला-"माझ्या दोन्ही मुलांना..."

"पुस्तकं, वह्या, दप्तर अन्...", कुशल बद्रिके रमला शाळेच्या आठवणीत, म्हणाला-"माझ्या दोन्ही मुलांना..."

Kushal Badrike: प्रत्येक व्यक्तीच्या मनात शाळेच्या अनेक खास आठवणी असतात. शाळेमध्ये केलेली मजा-मस्ती, मित्रांसोबत एकत्र खाल्लेला डब्बा आणि अभ्यास या सगळ्या गोष्टी मनाच्या एका कप्प्यात घर करुन राहतात. त्यात जून महिना सुरु झाला की, सर्वत्र मुलांची लगबग पाहायला मिळते. नवीन वर्ग, नवे शिक्षक याबद्दल मुलांना मोठी उत्सुकता असते. अशातच मराठी अभिनेता कुशळ बद्रिकेने (Kushal Badrike) त्याच्या मुलांच्या शाळेचा पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत मनातील आठवणी ताज्या केल्या आहे. 


कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. कुशल सध्या त्याच्या मुलांना शाळेत जाताना पाहून बालपणीच्या आठवणीत रमला आहे. त्याबद्दल सुंदर पोस्ट लिहित अभिनेत्याने म्हटलंय, "काही आठवणी विशिष्ट सुगंधासोबत जोडल्या गेलेल्या असतात. नवीन पावसाळी चपला, छत्री, पुस्तकं, वह्या, दप्तर यांना त्यांचा-त्यांचा असा वेगळा सुगंध असतो. आजही हा वास मला शाळेच्या पहिल्या दिवसात घेऊन जातो. पहिल्या दिवशी शाळेला जाताना घरातल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करून झाला की, आईची सूचनांची भलीमोठी यादी सुरू व्हायची. पावसात भिजू नकोस…,छत्री हरवू नकोस…,डबा उघडताना सांडू नकोस…, मस्ती करू नकोस….,शाळा सुटली की सरळ घरी ये वगैरे वगैरे !" 

पुढे कुशलने लिहिलंय,"शाळेच्या गेटवर पोहोचलो की, प्रत्येक वर्षी तीच शाळा नवीन वाटायची. वर्गात सगळ्यात पहिले जाऊन शेवटचा खिडकीजवळचा बेंच पकडण्याची माझी धडपड कायम असायची. शाळेतल्या “खिडकीपासून” सुरू झालेला प्रवास ट्रेनमधल्या “खिडकीपर्यंत” कधी येऊन पोहोचला मला कळलंसुद्धा नाही.हल्ली हल्ली, एखादी खानदानी परंपरा जपल्यासारखी, शाळेत जाताना आई देत असलेल्या सूचना आता माझी बायको माझ्या “दोन्ही” मुलांना सतत देत राहते.पावसात भिजू नका… छत्री हरवू नका…घरभर पसरलेल्या त्यांच्या नवीन चपला, नवीन दप्तरं, छत्र्यांचा वास घेत घेत घरातल्या “खिडकीतून” मी त्यांना बाय करत राहतो."

दरम्यान, कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी कमेंटस करत त्याचं कौतुक केलं आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर  "शाळा किती जिव्हाळ्याचा विषय"..., "कित्ती कित्ती भारी लिहता राव, काही क्षणासाठी शाळेत गेल्यासारखे वाटले...", अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

Web Title: marathi actor kushal badrike remembering school days shared post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.