"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
By देवेंद्र जाधव | Updated: June 17, 2025 11:48 IST2025-06-17T11:44:53+5:302025-06-17T11:48:07+5:30
मराठी सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. यामुळे अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेता अमोल बावडेकरसोबत (amol bawdekar) ही घटना घडली आहे. नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला तीन तास बाकी असताना अमोलला हृदयविकाराचा झटका आला. तरीही अमोलने प्रयोग करण्याची जिद्द काही सोडली नाही. परंतु डॉक्टरांनी परवानगी नाकारल्याने अमोलच्या नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. काय घडलं नेमकं?
अमोल बावडेकरला हृदयविकाराचा झटका
रविवारी १६ जून रोजी 'सुंदर मी होणार' या नाटकाचा प्रयोग विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह येथे होता. या प्रयोगाला तीन तास बाकी असताना अमोलला हृदयविकाराचा झटका आला. अमोलची पत्नी प्रेरणा बावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यावर अमोलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रुग्णालयात दाखल केल्यावर अमोलने डॉक्टरांना विनंती केली की, "मला फक्त तीन तासांची परवानगी द्या, मी प्रयोग करुन येतो, नंतर तुम्ही शस्त्रक्रिया करा." मात्र डॉक्टरांनी अमोलला परवानगी दिली नाही. त्यामुळे दीनानाथचा हाउसफुल्ल प्रयोग रद्द करावा लागला.
डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
डॉक्टरांनी सध्या अमोलला विश्रांती घ्यायचा सल्ला दिला आहे. उपचारानंतर ठणठणीत बरं झाल्यावर अमोल पुन्हा नाटकाचे प्रयोग करण्यास रंगभूमीवर कमबॅक करेल. सध्या अमोल यांच्या जागी 'सुंदर मी होणार' नाटकात अभिनेता अनिरुद्ध जोशी काम करणार आहे. अमोल बावडेकरला आपण 'पांघरुण' या मराठी सिनेमात आणि 'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमात अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय 'प्रतिशोध', 'कुंकु, टिकली आणि टॅटू' या मराठी मालिकांमध्ये अमोलने भूमिका साकारल्या आहेत.